मराठी कलाक्षेत्रातील कलाकार मंडळी आता अभिनय क्षेत्रासह इतर क्षेत्रातही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. मराठीतील दिग्गज अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे तर अभिनेता निरंजन कुलकर्णी या कलाकार मंडळींनी काही दिवासांपूर्वी हॉटेल व्यवसायात पाऊल टाकतं नवी सुरुवात केली आहे. आता लवकरच या यादीत ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलही सामील होणार आहे. नुकतीच तिने गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर हॉटेल सुरु करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या हॉटेलचं काम जोरात सुरु असून नुकतंच तिच्या हॉटेलची पहिली झलक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. (Rang maza vegla fame Actress start new hotel)
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री अनघा ही भगरे गुरुजींची कन्या आहे. अनघाने पुण्यातील डेक्कन परिसरात भाऊ अखिलेश भगरे याच्या जोडीने तिने हा नवा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. या हॉटेलचं नाव ‘वदनी कवळ’ असं ठेवणार असून याठिकाणी खवय्यांना शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. हॉटेलबाबतची बातमी अभिनेत्रीने गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिली होती. नुकतीच तिने एक स्टोरी शेअर केली होती त्यातून तिच्या हॉटेलची पहिली झलक दिसली आहे.

अनघा तिच्या हॉटेलसाठी स्वतः बरीच मेहनत घेताना दिसते आहे. तिने शेअर केलेल्या फोटोत अनघा हॉटेल स्वतः सजवताना, रंगकाम करतानाचा दिसत आहे. हे फोटो सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. सध्या हॉटेलमध्ये इंटिरियरचं काम सुरु आहे. याठिकाणी अस्सल पारंपारिक पदार्थांचा अस्वाद घेता येणार असल्याचं अनघाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. लवकरच हे हॉटेल खवय्यांसाठी खुलं होणार आहे.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून अनघा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. ज्यात तिने साकारलेलं ‘श्वेता’ हे पात्र प्रेक्षकांच्या बरंच पसंतीस पडलं होतं. चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर या मालिकेने गेल्या महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.