मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे. मराठीतील अनेक कलाकार एकामागोमाग एक विवाहबंधनात अडकत आहेत. मुग्धा-प्रथमेश यांच्या पाठोपाठ काल (२५ डिसेंबर) रोजी गौतमी-स्वानंद व स्वानंदी-आशिष या कलाकार जोड्या विवाहबंधनात अडकल्या. अशातच आता छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्रीचासुद्धा विवाहसोहळा पार पडला आले. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री मानसी घाटे हीदेखील नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. (Manasi Ghate Wedding)
‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेत मानसीने दिपाची मैत्रीण साक्षीची भूमिका साकारली होती. मानसीने प्रियकर आकाश पंडितबरोबर लग्नगाठ बांधली आहे. नुकताच या दोघांचा विवाहसोहळा पार पडला असून यांच्या लग्नाचे काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मानसीने तिच्या लग्नात खास मराठमोळा पारंपरिक लूक केला होता. तिने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती तर आकाशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता व त्यावर गुलाबी रंगचे धोतर परिधान केले होते, त्याचबरोबर त्यावर त्याच रंगाची पुणेरी पगडीदेखील परिधान केली होती. मानसी-आकाश या लग्नाच्या लूकमध्ये कमालीचे सुंदर दिसत होते.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अखेर स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी अडकले लग्नबंधनात, नववधूवराच्या साधेपणाची चर्चा
मानसी-आकाशच्या लग्नाला रंग माझा वेगळा या मालिकेतील कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती. अभिनेत्री हर्षदा खानविलकर व मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर मराठीतील काही कलाकारांनीदेखील या लग्नाला हजेरी लावली होती. त्याचबरोबर मानसीचे जवळचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवाराने या लग्नाला त्यांची विशेष उपस्थिती लावली होती.
दरम्यान, मानसीचा नवरा हादेखील याच क्षेत्रातला आहे. आकाश लायटिंग डिझायनर म्हणून इंडस्ट्रीत कार्यरत आहे. मानसीने दोन दिवसांपूर्वीच तिच्या लग्नाआधीच्या विधींचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले होते. तेव्हापासून चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागली होती आणि अखेरीस ही अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे.