उत्तर प्रदेश रामपूर पोलीस बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदाचा शोध घेत आहेत. खासदार-आमदार न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होतं. याबरोबरचं न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना जयाप्रदा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेशही दिले होते. त्यांना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची पथकं दिल्ली व मुंबईत दाखल झाली आहेत. रामपूर येथील खासदार-आमदार कोर्टात जया प्रदा यांच्याविरोधात दोन खटले चालू आहेत. (Up Police To Arrest Jayaprada)
जया प्रदा यांचा एक गुन्हा केमरी येथे तर दुसरा गुन्हा स्वार पोलीस ठाण्यात सुरु आहे. दोन्ही प्रकरणे लोकसभा निवडणूक २०१९ मधील आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित आहेत. या खटल्यांप्रकरणी सध्या न्यायालयात कार्यवाही चालू आहे. परंतु, जया प्रदा न्यायालयासमोर हजर झाल्या नाहीत. तब्बल सहा वेळा एनबीडब्ल्यू (अजामीनपात्र) वॉरंट जया प्रदा यांच्याविरोधात जारी करण्यात आलं आहे. तरीदेखील त्यांनी न्यायालयाच्या आदेशाला जुमानलं नाही.
जया प्रदा एकदाही न्यायालयासमोर हजर झाल्या नाहीत. परिणामी न्यायमूर्तींनी पोलीस अधीक्षकांना जया प्रदा यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले आहेत. रामपूर एसपींनी जया प्रदा यांचा शोध घेण्यासाठी एक टीम तयार केली आहे. आता पोलीस या अभिनेत्रीचा मुंबई व दिल्ली येथे शोध घेत आहेत. न्यायालयात सुनावणीदरम्यान जया प्रदा यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे वकील अझहर खान न्यायालयात पोहोचले होते. जया प्रदा कोर्टात हजर नसताना त्याच्या वकिलांनी कोर्टात रिकॉल अर्ज दाखल केला होता, पण तो फेटाळण्यात आला.
जया प्रदा यांचं हे प्रकरण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. आचारसंहिता लागू असतानाही जया प्रदा यांनी नूरपूर गावात रस्त्याचे उद्घाटन केल्याचा एक आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय दुसरी घटना केमारी पोलीस ठाण्यातील असून पिपलिया मिश्रा गावात आयोजित जाहीर सभेत जया प्रदा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.