प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेत्री दिशा परमार व गायक राहुल वैद्य यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण, या जोडीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दिशाने एका मुलीला जन्म दिला असून गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी या जोडीने ही आनंदाची बातमी दिली आहे. राहुलने ही बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली असून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Rahul Vaidya On His Daughter)
एका मुलीचे वडील झाल्यानंतर गायक राहुल वैद्यने सांगितले की, “जेव्हा त्याने आपल्या मुलीला पाहिले तेव्हापासून तो पाच सहा वेळा रडला आहे”. तो म्हणाला, “ही भावना पूर्णपणे वेगळी आहे. मुलीचा जन्म अत्यंत शुभ मुहूर्तावर झाला. गणेशजींसोबत लक्ष्मी आमच्या घरी आली आहे. दिशा आणि आमची मुलगी दोघेही ठीक आहेत.”
राहुल पुढे म्हणाला, “जेव्हाही मी तिच्याकडे पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतात. त्यावेळी बोलत असतानाही मी गुदमरून जातो, मला खूप बरं वाटतं. आपल्याला माहित असते की बाळ लवकरच होणार आहे. पण जेव्हा ते प्रत्यक्षात घडते, ती एक वेगळी भावना असते.”
राहुलला अजूनही विश्वास बसत नाही आहे की, तो बाप झाला आहे. याबाबत बोलताना राहुल म्हणाला, “मला अजूनही विश्वास बसत नाही की, आता मला मुलगी आहे आणि मी वडील आहे. जेव्हा मी फॉर्मवर सही करत होतो तेव्हा ‘वडिलांचे नाव’ असे लिहिले होते, त्या क्षणी मला वाटले की, शेवटी हा आनंद ही माझ्या वाटेल आला आहे.”
उद्या म्हणजेच २३ सप्टेंबरला राहुल वैद्यचा वाढदिवस आहे. यावेळी तो म्हणाला, “या वर्षीचा माझ्यासाठी हा सर्वात अविस्मरणीय वाढदिवस असेल, कारण दिशा व माझ्या मुलीला एकाच दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या मुलीचे घरी स्वागत करणार आहे.”