‘पोस्ट ऑफिस उघड आहे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका ४० भागांची असल्याचं आधीच जाहीर करण्यात आलं होत आणि आता या मालिकेने साऱ्यांचा निरोप घेतलाय. दरम्यान मालिकेतील कलाकारांनी एक ट्रेंड सुरु केला आहे. त्यांनी १९९७ सालचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आठवण शेअर केलीय. यांत सगळ्याच कलाकारांचा सहभाग पाहायला मिळाला. अशातच पृथ्वीकने शेअर केलेल्या फोटोसह त्याच्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलय.(Prithvik Pratap Emotional Post)
पहा पृथ्वीकची भावुक पोस्ट (Prithvik Pratap Emotional Post)
पृथ्वीकने भावुक होत केलेली ही पोस्ट वाचून डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही. यावेळी त्याने लिहिलंय, ‘२ एप्रिल २०२३ ला ‘पोस्ट ॲाफिस उघडं आहे’ चा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्या निमित्ताने १९९७ सालचे फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आणि आज दुपार पर्यंत खूप शोधा शोध करुनही मला १९९७ सालचा माझा एकही फोटो मिळाला नाही. पण एक अत्यंत महत्त्वाची वस्तू सापडली ती म्हणजे ‘माझ्या वडिलांनी माझ्या आईला लिहीलेली पत्र’ १९९३ ची ही पत्र… बाबा ला कर्करोग असल्यानं तो उपचारासाठी मुंबईच्या एका हॅास्पिटल ला ॲडमिट होता. अंधेरीत आमच्या नातेवाईकांकडे बाबा महिना- दोन महिना राहिला होता… नातेवाईकांवर जास्त भार नको म्हणून आई माझ्या वडिलांपासून बऱ्यापैकी लांब राहत होती.

कधी तिच्या आई वडिलांकडे सूरत ला, कधी सासू सासऱ्यांकडे गावी, कधी भावाकडे, कधी पुण्याच्या भाड्याच्या घरात… आणि या धावपळीत २ आठवड्यातून एकदा-दोनदा त्यांची भेट होत असे. पण त्यांची एकमेकांसाठीची काळजी, प्रेम, माया आणि सगळ्या सगळ्या भावना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा जो होता तो म्हणजे ‘पत्र’. ३ एप्रिल २०२३ ला ही सगळी जुनी पत्र जी आईने बाबाला आणि बाबाने आईला लिहीली होती ती पहिल्यांदा वाचली. डोळे पाणावले, थोडा स्तब्ध झालो, कधी चेहऱ्यावर स्मित आलं कधी अगदीच गहिवरून आलं.
सगळी पत्रं वाचून काढली.. सगळे क्षण खऱ्या अर्थाने त्या त्या काळात जाऊन अनुभवले..जगलो.. पुढे अल्पावधीत बाबा निधन पावला आणि हा पत्रव्यवहार कायमचा थांबला. सगळा पसारा आवरून शांत बसलो असताना एक गोष्ट लक्षात आली; तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी ते जास्तीत जास्त मेंदू पर्यंत पोहोचेल पण पत्रांसारखं मनाचा ठाव कधीच घेऊ शकणार नाही.
हे देखील वाचा – आणि निळू फुले दादांना म्हणाले ‘अशोक सराफला घ्या’
‘पोस्ट ॲाफिस उघडं आहे’ च्या निमित्ताने पोस्टाच्या जवळ जाऊ शकलो आणि पत्रांच महत्त्व समजू शकलो. यानंतर त्याने सोनीमराठी, वेट क्लाउड प्रोडक्शन,अमित फाळके,सोहा कुलकर्णी,सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अवधूत पुरोहित यांचे आभार मानलेत. पुढे त्याने लिहिलंय ‘हा माझा आणि दादाचा हा फोटो कदाचित १९९५-९६ चा असावा. १९९७ चा फोटो अजूनही सापडला नाहीये.(Prithvik Pratap Emotional Post)

अगदी पृथ्वीकने म्हटल्याप्रमाणे पत्रांसारखा मनाचा ठेवा कुणीही जपणार नाही. आज पृथ्वीकचे बाबा आपल्यात नसले तरी त्यांनी लिहिलेल्या पात्रांनी पुन्हा एकदा त्यांच्या सोन्याची जाणीव लकरून दिली. पत्र हे माध्यम होत म्हणून कर्करोगासाठी उपचार करण्यासाठी मुंबईत असणारे पृथ्वीकचे बाबा त्याच्या आई पर्यंत पत्रातून पोहचू शकले. पत्र हा त्यांच्यातला दुवा ठरला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
आज पृथ्वीकने केलेली पोस्ट पाहून पुन्हा एकदा पत्रव्यवहाराची महती पटली. आजच्या इंटरनेटच्या दुनियेत आपण जरी बरेच पुढे गेलो असलो तरी ही पत्र आपल्याला जोडून ठेवतायत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आज आपण पत्रव्यवहार पूर्णच थांबवलाय मग जरा मागे वळून पाहिलं तर तो व्यवहार अनुभवणं खूपच रंजक असेल.
