आजच्या २ ऑगस्ट २०२३ ची सुरुवात अशी धक्कादायक बातमीने होईल असे अजिबात वाटले नव्हते. नितीन चंद्रकांत देसाईने ठरवले तरी कसे आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवावे? असं काय घडलं की आपल्या मेहनती, यशस्वी, चौफेर कारकिर्दीचा असा क्लायमॅक्स करावा? हा धक्का पचवणे अवघड आहे. काही यशस्वी सिनेमावाल्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट असा आत्महत्येने का करावे? आर्थिक विवंचना, कर्जबाजारीपणा अशा कारणांमुळे नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला असेल तर चकाचक, ग्लॅमरस मनोरंजन क्षेत्राचा भेसूर चेहरा समोर येतोय. काही कोटींचे कर्ज काढून आपल्या स्टुडिओचा सांभाळ करण्याची काय गरज होती असा प्रश्न आहेच. यामागची कारणे नितीन देसाईनाच माहित. (Nitin Desai WIth Narendra Modi)
फार पूर्वी मुलुंड राहणारे नितीन देसाई अतिशय ध्येय आणि सकारात्मक दृष्टिकोनातून चित्रपट कलेच्या माध्यमात आले. मला आठवतय साधारण बत्तीस वर्षांपूर्वी नितीन देसाई कला दिग्दर्शक नीतिश राॅय यांच्याकडे सहाय्यक होते. तेव्हा विधु विनोद चोप्रा यांच्या ‘परिंदा ‘साठी छोट्या लाॅन्चेच्या सेटमुळे ते नावारूपास आले. राॅय यांच्याकडे अनेक गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. शिकून घेतले. चित्रपट माध्यम व व्यवसाय यांबाबत बरेच काही जाणून घेतले. त्यानंतर अधिकारी बंधुंच्या ‘भूकंप ‘ ( १९९३) पासून त्यांनी स्वतंत्रपणे कलादिग्दर्शन सुरु केले. याच काळात नितीन देसाईशी झालेला परिचय मग प्रत्येक भेटीत दृढ होत गेला. आमच्या नात्यात महत्वाचा घटक होता, चित्रपट. मग एकाद्या चित्रपटाच्या मुहूर्ताला, सेटवर, पार्टीत भेट होताच एकाद्या चित्रपटाबाबत आम्ही मनसोक्त, मनापासून बोलत असू.
हे देखील वाचा- लालबागच्या राजाच्या मंडप सजावटीचं काम करणार होते नितीन देसाई, दोन दिवसांपूर्वी लालबागमध्येही पोहोचले होते अन्…
विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘१९४२ अ लव्ह स्टोरी ‘ ( १९९४) च्या वेळेस नीतिन चंद्रकांत देसाई या नावाला वलय आले. या चित्रपटाचे मोठे चित्रीकरण सत्र हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे पार पडल्यावर मुंबईत गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत डलहौसीचा हुबेहुब सेट लावला होता. या सेटला भेट दिल्यावर दिग्दर्शक विजय आनंद यांनी विशेष कौतुक केल्यावर नितीन चंद्रकांत देसाई नावारूपास आले आणि त्यांच्या कारकिर्दीने अतिशय मोठी झेप घेतली. त्यानंतर देसाई यांनी खरोखरच मागे वळून पाहिले नाही असेच म्हणता येईल. पण प्रत्येक पावलावर यश प्राप्त करीत असतानाच देसाई यांचे वागणे मात्र तसेच गप्पिष्ट, सहकार्य करणारे राहिले. त्यांच्यातील माणूसपण कायम राहिले हे जास्त उल्लेखनीय आहे.(nitin desai suicide marathi news)
‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटांच्या व्यक्तिमत्व व यशात नितीन देसाई यांचा मोठाच वाटा होता. भव्य दिमाखदार चित्रपट आणि नितीन देसाई यांचे कला दिग्दर्शन हे समीकरण घट्ट होत गेले. पण त्यांच्यातील भावनिकता कायम राहिली. विशेषत: वडिलांच्या निधनानंतर ते फारच हवालदिल झाले होते.
२००५ साली त्यांनी कर्जत तालुक्यातील चौक गावातील भव्य एन. डी. स्टुडिओ हे त्यांचे आयुष्यातील खूपच मोठे स्वप्न व वैशिष्ट्य. स्टुडिओत ऐतिहासिक चित्रपट, मालिका, वेबसिरिज यांच्या उपयुक्त असे भव्य दिव्य सेट, देखावे होते. हा स्टुडिओ त्यांच्या व्यक्तिमत्वचा, आयुष्याचा, आनंदाचा भाग झाला होता. (Nitin Desai commits suicide in karjat studio)
त्याच त्यांच्या स्टुडिओत नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं.. स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. आता पोलीस पुढील तपास करत आहेत. नितिन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
हे देखील वाचा-नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अभिनेते आदेश बांदेकर भावुक, म्हणाले “त्याने त्याच्या मनातील व्यथा…”
एनडी स्टुडीओ हे नितीन देसाई यांचं दुसरं घरच होतं. आत्महत्येच्या दोन दिवसांपासून ते स्टुडीओमध्येच होते. कालपर्यंत आपल्या टीमला त्यांनी आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. पण आज सकाळपासूनच त्यांनी कोणाचाही कॉल उचलला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एनडी स्टुडिओच्या अधिकाऱ्यांना याबद्दल कळवलं. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला आणि पोलिसांना याबद्दल माहिती दिली.
नितीन देसाई आणि मोदी कनेक्शन (Nitin Desai WIth Narendra Modi)
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांपर्यंत नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. नितीन देसाई यांनी शुन्यातून स्वर्ग निर्माण केला आहे. त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. नितीन देसाई यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना मुंबईत आले होते तेव्हा कमळातून मोदींना भाजपाच्या कार्यकत्यांसमोर पेश केलं गेलं होतं ती कल्पनाही नितीन देसाई यांची होती.
चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त असे कला दिग्दर्शक होते.
आता आठवणीत राहिलेत त्यांचे बहुस्तरीय कला दिग्दर्शन, त्यांचे व्हीजन, त्यांच्या अनेक भेटीगाठी. मला आठवतय काही वर्षांपूर्वीच नीतिन देसाई आमच्या गिरगावातील केशवजी नाईक चाळीतील श्रीगणेशोत्सव पाह्यला आवर्जून आले होते. मीदेखील तेव्हा त्यांच्यासोबत होतो. हा शंभर वर्ष जुना श्रीगणेशोत्सव पाह्यला आवर्जून आलोय. एक वेगळा अनुभव आला असे ते म्हणाले. जागतिक कीर्ति प्राप्त असूनही अशा नवीन अनुभवासाठी आतूर असलेले असे हे वेगळेच व्यक्तिमत्व होते…
दिलीप ठाकूर