स्टार प्रवाहवरील टीआरपीच्या शर्यतीत कायम अग्रेसर असणारी मालिका म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका. या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, शुभांगी गोखले, योगेश केळकर सह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेच्या प्रत्येक नवीन अपडेट्सची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. मात्र आता या मालिकेबद्दलची एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत कायमच अग्रस्थानी राहिलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून मुख्य अभिनेत्री तेजश्री प्रधानने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेजश्रीच्या चाहत्यांसह मालिकेच्या प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे. (tejashri pradhan premachi gosht exit)
मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत असताना आणि टीआरपीमध्येही मालिका हिट होत असताना तेजश्रीने अचानक मालिका का सोडली? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तेजश्रीने मालिका सोडल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप अद्याप समोर आलेली नाही. पण तिच्या या निर्णयावर चाहते नाराज झाले आहेत. या सगळ्या चर्चांमध्ये तेजश्रीच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तेजश्रीने तिच्या सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे आणि या पोस्टखाली तिने “कधीकधी तुम्हाला बाहेर पडावे लागते. तुमची योग्य किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण तुमच्यासाठी ते कोणीही करणार नाही” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – आभ्याच्या बोलण्यामुळे रेश्मा नाराज, केवडाप्रती असलेलं प्रेम पाहवेना, नात्याला कोणतं नवं वळण मिळणार?
मालिका सोडण्याबद्दल तेजश्रीने अधिकृत भाष्य केलं नसलं तरी तिच्या या मताशी अनेकांनी संमती दर्शवली आहे. याबद्दल त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत आणि या स्टोरी तेजश्रीने रीशेअर केल्या आहेत. यामध्ये चाहत्यांनी “आजचा शहाणपणाचा निर्णय उद्याला चांगला आकार देतो”, “हे स्वीकारणे कठीण आहे. पण तू अधिक चांगल्यासाठी पात्र आहेस पुढे जा”, “तेजश्री तू एक प्रतिभावान आणि हुशार अभिनेत्री आहेस. त्यामुळे तू अधिक चांगल्यासाठी पात्र आहेस. तू ज्याप्रकारे मुक्ता साकारली आहेस, त्यामुळे या पात्राला वेगळी ऊंची मिळाली आहे. पुढे नक्कीच नवीन प्रोजेक्ट मधुन भेटायला येशील. पण तुझी कमी कायम भासत राहील. तू आमची आवडती अभिनेत्री आहेस”.

तेजश्रीने मालिका सोडल्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी मालिका का सोडली? यामागचं कारण विचारलं आहे. तर काहींनी तेजश्रीने घेतलेल्या निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमध्ये तेजश्रीने मुक्ताची भूमिका साकारली. तिने साकारलेल्या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. जान्हवी व शुभ्राप्रमाणे तेजश्रीने साकारलेली मुक्ता ही भूमिकादेखील घराघरांत प्रसिद्ध झाली. पण, आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री दिसणार नाही.