‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारली होती. तिने साकारलं हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं. या लोकप्रिय मालिकेनंतर अपूर्वा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, या मालिकेत अभिनेत्री सावनी हे पात्र साकारत आहे.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी अपूर्वा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा चांगलाच चाहतावर्ग आहे. अभिनेत्री तिच्या फोटो व व्हिडीओसह अनेक विविध पोस्टही शेअर करत असते. अशातच अपूर्वाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या सावनी या भूमिकेमधील काही फोटो शेअर केले असून या फोटोखाली तिने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे आणि तिने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या पोस्टमध्ये अपूर्वाने असं म्हटलं आहे की, “कलाकार होणे कठीण” आहे. त्यासाठी कठोर परिश्रम, संयम, सराव, प्रेरणा, समर्थन आणि स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य त्याचबरोबर आपल्याला पाहिजे तसे जगण्याचे स्वातंत्र्य आवश्यक आहे. कधीकधी तुम्ही समाजाच्या चौकटीत बसत नाही, कारण त्यात राहणे तुम्हाला पिंजऱ्यासारखे वाटते. एका कलाकाराला त्या बेड्या तोडून स्वतःचे जग निर्माण करण्याची सतत इच्छा असते, जे सर्वसामान्यांपेक्षा वेगळे असते”.
आणखी वाचा – अक्षरा आजीकडून शिकत आहे कोल्हापूरी भाषा, अधिपतीला प्रपोज करत देणार सरप्राइज, नव्या नात्याला लवकरच सुरुवात
यापुढे तिने असं म्हटलं की, “एक असे जग जिथे कला निर्बंध किंवा संघर्षांशिवाय असेल. त्यांना समाजाचे नियम समजत नाहीत; ते त्यांना प्रश्न करतात. पण त्यांना गप्प राहण्यास सांगितले जाते. ते त्यांच्या कलेतून आवाज उठवतात आणि त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनेकदा हिरावून घेतले जाते. मग फक्त दोन पर्याय उरतात. एकतर गप्प राहा आणि नियमांचे पालन करा किंवा ते नियम तोडून स्वतःचे जग तयार करा”.