Ganeshotsav Special Media : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणेशाची स्थापना होण्यापूर्वी सगळेच जोरदार तयारीला लागलेत. अनेकांनी तर थेट कोकणाची वाट धरली आहे. असं म्हणायला हरकत नाही की, कोकणातील गणेशोत्सवात संपूर्ण मुंबई रिकामी करण्याची ताकद आहे. अगदी या म्हणण्यानुसार चाकरमनी कोकणात पोहोचले आहेत. गणेशोत्सवानिमित्त सगळेचजण एकत्र कुटुंबाचा अनुभव घेताना दिसतात. अशातच अनेक कलाकार मंडळीही कोकणात जात गणेशोत्सवाचा आनंद लुटताना दिसतात. कोकणाच्या गणेशोत्सवात नेहमीच सहभागी होणारं कपल म्हणजे सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन.
प्रथमेश हा मूळचा कोकणातील आहे. नेहमीच तो अधूनमधून कोकणात जाताना दिसतो. अशातच गणेशोत्सवादरम्यान प्रथमेश व मुग्धा दोघेही कोकणात पोहोचले आहेत. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्यांच्या गणपती शाळेची झलक शेअर केली आहे. ‘लघाटे बंधू कलाश्री मूर्तिशाळा’ या नावाने त्यांची गणपती शाळा आहे. गावाकडे प्रथमेशच एकत्र कुटुंब आहे. आणि त्याची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय.
आणखी वाचा – संकर्षण कऱ्हाडेच्या ‘तू म्हणशील तसं’ नाटकाचा शेवट, निरोप घेताच अभिनेता भावुक, म्हणाला, “तुमच्या मनांत…”
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये प्रथमेशच्या घरातील सगळीच मंडळी कार्यशाळेत काम करताना दिसत आहेत. यांत महिलांचाही समावेश आहे. अगदी मुग्धाही गणेशाची मूर्ती रंगवताना दिसत आहे. “जगाला साकार करणारा स्वतः साकार होतोय, लघाटे बंधू कलाश्री मूर्तिशाळा”, असं कॅप्शन देत त्यांनी लघाटे कुटुंबाच्या एकोप्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच गणेशाच्या सेवेत रुजू झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून सगळेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
प्रथमेशने शेअर केलेल्या या व्हिडीओवर सुकन्या मोने यांनी कमेंट करत, “हे दृश्य आज विरळ झालं आहे. लघाटे कुटुंबीय कायम असेच रहा”, असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे. “किती छान..आपली संस्कृती अशीच पुढे नेत रहा”, “श्री गणेश उत्सव,कोकण आणि पार्श्वगायन पंडित अजित कडकडे !! संपूर्ण कुटुंबावर कलांचा अधिपती श्री गणेशाचा कृपाशीर्वाद सदैव राहू दे”, “ग्रेट रे प्रथमेश. मुग्धा तुझे विशेष कौतुक. अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे बापाच्या सेवेत”, “मूर्ती खूप छान आहेत. कारण त्यांना आकार देणारे हात संस्कारक्षम आहेत”, अशा कमेंट करत अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.





