आपण करत असलेल्या कामाचे कौतुक होणे, आपली कला प्रत्येकाला आवडणे व एखादा मनुष्य आपल्या कलेचा रसिक होणे ही प्रत्येक कलाकारासाठी महत्त्वाची गोष्ट असते आणि याच कौतुकासाठी प्रत्येक कलाकार मेहनत घेत असतो आणि प्रत्येक कलाकाराच्या आपल्या चाहत्यांबद्दलचे हे असे अनुभव पदोपदी येतच असतात. असाच एक अनुभव अभिनेते प्रशांत दामले यांनी शेअर केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याच्या निमित्ताने प्रशांत दामलेंनी त्यांच्या एका चाहत्याची आठवण शेअर केली आहे.
मराठी रंगभूमीवरील नाटकाचे विक्रमादित्य म्हणून प्रशांत दामलेंची विशेष ओळख आहे. त्यांनी आजवर अनेक नाटकं, मालिका, चित्रपट व जाहिरातींमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला चाहत्यांचे अनेक किस्से, प्रसंग आहेत. यापैकी एका चाहत्याची आठवण सांगताना त्यांनी असं म्हटलं की, “मराठी नाटक बघायला येणाऱ्या लोकांना आपण नाट्यरसिक का म्हणतो? हा प्रश्न मी स्वत:ला विचारल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर काही उदाहरणे येतात आणि त्यापैकी हे एक उदाहरण मी सांगतो.”
प्रशांत दामलेंनी हा किस्सा सांगत असं म्हटलं की, “एका नाट्यगृहामध्ये माझं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक सुरु होतं आणि त्याच नाट्यगृहात काही दिवसांनी माझं दुसरं नाटक होतं. तर ते नाटक बघण्यासाठी एक विकलांग कुटुंब आले होते. म्हणजे आई-वडील व्यवस्थित पण त्यांचा मुलगा विकलांग होता आणि त्यावेळी मध्यांतरात ते आई-वडील मला भेटायला आले आणि ते मला “आमचा मुलगा फक्त तुमचीच नाटकं बघतो. पण तो तुम्हाला भेटायला वर येऊ शकत नाही कारण तो विकलांग आहे. तर तुम्ही त्याला वर येऊन भेटाल का?” असं म्हणाले. यावर प्रशांत दामलेही त्यांना “हो येतो” असं म्हणाले.
आणखी वाचा – मेष, कन्या व कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे भाग्यशाली, कुणाच्या नशिबात काय असणार?, जाणून घ्या…
यापुढे दामलेंनी असं म्हटलं आहे की, “मी मध्यांतरात त्यांना हो म्हटलं. पण नाटक संपल्यानंतर सगळ्या गडबडीत त्यांना भेटायचं माझ्या डोक्यातून गेलं आणि मी बाकी लोकांना वगैरे भेटून निघालो तर त्या ज्या माता होत्या त्यांनी मला वरुन “आम्ही थांबलो आहोत” अशी हाक मारली. मग् मी वर जाऊन त्या मुलाला जवळ घेतलं त्यच्याबरोबर फोटो काढले. तर असे अनेकानेक प्रसंग माझ्या वाटेला आले आहेत.”