झी मराठी वाहिनीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदाचा ‘झी मराठी पुरस्कार २०२४’ हा सोहळा तब्बल दोन दिवस पार पडला. या सोहळ्यात मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेतील लोकप्रिय जोड्यांचे रोमँटिक डान्स, विनोदी कलाकारांचे तसेच खलनायिकांचे परफॉर्मन्स, अक्षरा-अधिपतीचं रोमँटिक प्रपोजल, संकर्षण व मृण्मयी यांचे सूत्रसंचालन आणि ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’ अशा जुन्या मालिकांच्या आठवणी यामुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला. यंदा पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. यात ‘पारू’ मालिकेने सर्वाधिक पुरस्कार पटकावले. (Prasad Jawade Award)
‘झी मराठी पुरस्कार २०२४’मध्ये ‘पारू’ मालिकेतील आदित्य म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेला सर्वोत्कृष्ट नायक हा पुरस्कार मिळाला आहे. याच पुरस्कारानिमित्त प्रसादची बायको व अभिनेत्री अमृता देशमुखने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रसादच्या ‘पारू’ मालिकेतील भूमिकेच्या लूकमधील व्हिडीओ शेअर करत अमृताने प्रसादविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओसह तिने असं म्हटलं आहे की, “मी प्रसादच्या प्रेमात पडायच्या आधी त्याच्या डोळ्यांच्या प्रेमात पडले होते. अतिशय बोलके आणि भावपूर्ण डोळे. त्याच्यापेक्षा त्याचे डोळेच जास्त नीट व्यक्त होऊ शकतात खरंतर. ‘पारु’ मालिकेमधला आदित्य बघताना त्रास होतो की, आत्तापर्यंत ज्या सगळ्या छटा मी बघत होते आज पुर्ण महाराष्ट्र बघत आहे”.
आणखी वाचा – जान्हवीपाठोपाठ आता निक्की व अरबाजही जाणार सूरजच्या गावी, व्हिडीओ कॉल करत म्हणाली, “भावा लवकरच…”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “आपल्या आवडीचं एखादं गाणं, अचानक व्हायरल झाल्यावर जो त्रास होतो तसं काहीसं. पण झी मराठी आणि ‘पारु’ मुळे प्रसाद आज लोकांच्या मनात व्हायरल होत आहे जाणवत आहे आणि छान वाटत आहे. लग्न झाल्या झाल्या मी त्याला साताऱ्यात वनवास भोगायला पाठवलं. खूप अडचणी आल्या, काही त्याने निर्माण केल्या, पण अॅक्शन व कटमध्ये त्याने कधीच तडजोड केली नाही. त्यामुळेच त्याने ‘सर्वोत्कृष्ट नायक’ या मृगाची शिकार केली. प्रसाद मला तुझा खूप अभिमान आहे”.
दरम्यान, अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून ते घराघरांत पोहचले. ‘बिग बॉस’नंतर दोघांनी गुपचूप साखरपुडा करत सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला होता आणि मग या दोघांनी एकमेकांबरोबर थाटामाटात विवाह केला. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात आणि त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात.