मराठी अभिनेता शशांक केतकर हा मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा आहे. त्याने आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनयाशिवाय सोशल मीडियावरील त्याच्या अनेक सामाजिक विषयांवरील व्हिडीओमुळेही चर्चेत राहत असतो. याआधी त्याने अनेकदा रस्त्यावरील कचऱ्याबाबत व्हिडीओ केले असून त्याच्या या व्हिडीओमुळे प्रशासनाने दखल घेत त्या ठिकाणचा कचरा उचलला असल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या आठवड्यात त्याने मालाड मालवणीमधील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनाने इथला कचरा उचलला. अशातच आता शशांकने पुन्हा एकदा त्याच्या ठाणे शहरातील कचऱ्याचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Shashank Ketkar Garbage Video)
शशांकने हा खास व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “सुप्रभात, दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. सगळीकडेच छान रोषणाई आणि साफसफाई केली जात आहे. आमच्या ठाण्यात घाणेकर चौकातही स्वच्छता आणि रोषणाई आहे. तिथे मोठा डिजिटल स्क्रीन आहे, ज्यावर अनेक राज्यकर्त्यांच्या व बिल्डर्सच्या जाहीराती लावल्या जातात. त्यामुळे तो चौक मोठा असल्याने तिथे स्वच्छता ठेवली जाते. त्याजवळच मी राहत असलेल्या सोसायटीतही ठाणे महानगरपालिकेने स्वच्छता ठेवलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. त्यामागे एक योजनाही आहे ती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो”. यापुढे शशांकने मैदानाजवळची काही दृश्ये दाखवली आहेत, ज्यात खूप कचरा असल्याचे पाहायला मिळत आहे. या कचऱ्यामध्ये दारूच्या बाटल्या, खराब गादी, खाऊचे पाकीट, प्लॅस्टिक, तंबाखू, फ्लेक्स, लाकूड, पेपर, थर्माकॉल आणि देव्हारा अशा काही वस्तू आहेत.
आणखी वाचा – जान्हवीपाठोपाठ आता निक्की व अरबाजही जाणार सूरजच्या गावी, व्हिडीओ कॉल करत म्हणाली, “भावा लवकरच…”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “मला घाम आला आहे कारण मी ऑक्सीजनच्या शोधात मॉर्निंग वॉकला गेलो होतो. मैदानाजवळ काही मुलं खेळत आहेत फिटनेसच्या शोधात आणि ठाणे महानगरपालिका आहे झोपली आहे दिवाळीची आनंदात… ठाणे महानगरपालिकेने आमची सोसायटी अगदी स्वच्छ ठेवली आहे. खरंतर ही सजावट नसून दिवाळीचे प्रदर्शन आहे. इथे खूप स्वस्तात गोष्टी मिळत आहेत, त्यामुळे पटपट येऊन उचला. गेले आठ दिवस हा कचरा इथे आहेच, पण यापुढे अजून किती दिवस हे इथे असेल ते माहीत नाही”.
आणखी वाचा – मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावाचा पहिला फोटो समोर, आहे खूपच गोड, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
तसंच या व्हिडीओच्याखाली कॅप्शनमध्ये त्याने अनेक राजकीय पक्षांना तसंच महानगरपालिकेला टॅग करत असं म्हटलं आहे की, “धन्यवाद सर्वांनी ठरवलं तर देश असाच घाण राहू शकतो. आम्हीसुद्धा तुम्हाला मदत करू.. सगळे मिळून घाण करू. आली आली दिवाळी, असाच कचरा दिसूदे रोज सकाळी”. दरम्यान, या व्हिडीओखाली शशांकच्या या कृतीचे अनेकांनी समर्थन केलं आहे. तसंच त्याच्या या कृतीबद्दल कौतुकही केलं आहे.