Poonam Pandey Died at 32 : वयाच्या ३२व्या वर्षी अभिनेत्री पूनम पांडेचं सर्वायकल कॅन्सरने निधन झालं. अभिनेत्रीच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे सर्वाइकल कॅन्सरबद्दल पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. नेमका हा आजार काय आहे, या आजाराची लक्षणे काय आहेत ते या आजारावर उपचार काय इथवर चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच समस्त महिलावर्गाला पडलेल्या या प्रश्नांची उत्तरे ‘मज्जा पिंक’ या युट्युब चॅनेलवरुन समोर आली आहेत.
‘मज्जा पिंक’ चॅनेलने नुकतीच तज्ञांसह बोलून या आजाराबाबतची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये काही महिलांना आढळणारी लक्षणे वेगळी असू शकतात आणि त्यावरचे उपचारही वेगळे असू शकतात याची नोंद घेण्यासही सांगितलं आहे. सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय याबाबत सांगितलेल्या माहितीद्वारे असं समोर आलं आहे की, “सर्वायकल कॅन्सर हा स्त्रियांमधील सर्विक्स या अवयवात होणारा कॅन्सर आहे. याबद्दल महिलांमध्ये जागरुकता निर्माण होणे महत्वाचं असते. जगामधे महिलांमध्ये आढळणारा सर्वायकल कॅन्सर हा सर्वात सामान्य विकार आहे. भारतात ६ – २९% महिलांना हा कर्करोग होतो.
मुळात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत.हा कर्करोग गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरु होतो, म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात. सर्वायकल कॅन्सर हे २ प्रकारचे असतात. पहिला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि दुसरा म्हणजेच एडेनोकार्सिनोमा. सर्वायकल कॅन्सर हा प्रामुख्याने ह्युमन पॅपीलोमा व्हायरस या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो. जो योनि, तोंडी किंवा गुदव्दार संभोगाद्वारे एखाद्या व्यक्तीतून दुस-या व्यक्तीत पसरू शकतो. याचे प्रमाण ३५ ते ५५ वयाच्या महिलांमध्ये जास्त आढळून येते.
सर्वायकल कॅन्सरची लक्षणे
अनियमित मासिक पाळी
वजन कमी होणे
गर्भाशयातून पांढऱ्या पदार्थाचा स्त्राव होणे
वारंवार लघवीला होणे
छातीत जळजळ होणे
जुलाबाचा त्रास होणे
भूक न लागणे किंवा जेवताना पोट भरल्यासारखे वाटणे
खूप जास्त थकवा जाणवणे
ओटीपोटात खूप वेदना होणे किंवा सूज येणे
बऱ्याच वेळेस थोडा ताप येणे आणि सुस्त वाटणे
शारीरिक संबंधांनंतर रक्तस्त्राव होणे
मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे
सर्वायकल कॅन्सर नेमका कशामुळे होतो?एचपीव्ही हा विषाणू शरीरात पसरल्यामुळे सर्वायकल कॅन्सर सुरु होतो. त्याशिवाय आनुवंशिकता हेही याचे प्रमुख कारण आहे हा सर्वायकल कॅन्सर हा कौटुंबिक इतिहासामुळेही होऊ शकतो असंही आढळून आलं आहे. तसेच, सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनमुळेही हा कॅन्सर होऊ शकतो.
काळजी कशी घ्यावी
जर तुम्हाला सर्वायकल कॅन्सरपासून स्वत:चं संरक्षण करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची योग्य काळजी घेणं शरीर स्वच्छ ठेवणे. नियमितपणे या रोगाशी संबंधित चाचण्या करणे. धूम्रपानाच्या अतिसेवनानेही सर्वायकल कॅन्सर होऊ शकतो. सर्वायकल कॅन्सर अनेक प्रकारच्या एचपीव्हीमुळे होतो.
सुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यामुळे सर्वायकल कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.
महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची वाढती प्रकरणे लक्षात घेता, भारत सरकारने गेल्या वर्षी जाहीर केले की, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरु करण्यात येईल. या मोहिमेअंतर्गत, महिलांना लस देण्यात येईल, जी HPV धोका कमी करण्यास मदत करेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत २०२४-२०२५ चा केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, सरकार गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी ९ ते १४ वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यास आवाहन करणार आहे. ही लस सर्वत्र उपलब्ध आहे आपल्या जवळच्या गायनॅकॉलॉजिस्टकडे जाऊन तुम्ही सुद्धा त्यावर योग्य ती माहिती घेऊन घेऊ शकता.