मराठी मनोरंजन सृष्टीची कलरफूल अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. गेले काही दिवस पूजा चांगलीच चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणबरोबर साखरपुडा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पूजा-सिद्धेशच्या कुटुंबाव्यतिरिक्त मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते. आता लवकरच पूजा व सिद्धेश विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.
अलीकडेच सावंत आणि चव्हाण कुटुंबीयांचे व्याहीभोजन पार पडले. या विधींचे काही फोटो पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यामध्ये पूजा व सिद्धेशचे कुटुंबीय एकमेकांचा मानपान करताना पहायला मिळाले. अशातच आता पूजा तिच्या लग्नाआधी संगीत समारंभासाठीची तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पूजा तिच्या संगीत समारंभासाठी सराव करत असल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये पूजा तिची बहीण रुचिरा सावंतबरोबर डान्सचं सराव करत असताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर पूजाच्या काही भावंडांनीदेखील या डान्सचा सराव करताना दिसत आहेत. “वधूकडची मंडळी” असं म्हणत पूजाने एक खास फोटोदेखील शेअर केला असून या फोटोमध्ये तिचे काही नातेवाईकही पाहायला मिळत आहे.
तसेच अभिनेत्री सुखदा खांडकेकरनेदेखील सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वत: सुखदा, पूजा सावंत, गश्मीर महाजनीची बायको, भूषण कडू, वैभव तत्ववादी व पूजाचा भाऊ व काही इतर भावंडंही पाहायला मिळत आहे. “लडकीवाले” असं म्हणत सुखदाने हे फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, पूजाने शेअर केलेले हे फोटो व व्हिडीओ पाहून अनेकांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे अभिनेत्री विवाहबंधनात कधी अडकणार?, तसेच तिच्या संगीत समारंभात काय धमाल उडणार? याकडे तिच्या अनेक चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.