छोट्या पडद्यावरुन लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेता अयुब खान यांना खरंतर ओळखीची गरज नाही. बेगम पारा व अभिनेता नासिर खान यांच्या पोटी जन्मलेला अयुब खान हा ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा भाचा आहे. फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या अयुबने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला, पण बॉलिवूडने त्याला विशेष साथ दिली नाही. मात्र अभिनेत्याचे मालिकाविश्वात नशीब चमकले. एकामागून एक अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये त्याने दमदारअभिनय केला. (ayub khan biography)
अयुब खान यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मुंबई येथे झाला. १९९२ मध्ये ‘माशूक’ चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या जगात प्रवेश केला. १९८८मध्ये प्रसारित झालेल्या बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या प्रसिद्ध मालिकेतही तो झळकला. नासिर खान व बेगम पारा जेव्हा कलाकार म्हणून लोकप्रिय होते तेव्हा त्यांना त्यांच्या मुलांपैकी एक तरी चित्रपटसृष्टीत यावा अशी इच्छा होती. दरम्यान अयुबच्या भावाने व बहिणीने चित्रपटसृष्टीत येण्यास नकार दिला, त्यामुळे आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अयुबने सिने-इंडस्ट्रीत प्रवेश केला.
अयुबला चित्रपटांतून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली नाही, पण छोटय़ा पडद्यावर व सहाय्यक भूमिकेत त्याचे खूप कौतुक झाले. अयुबच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १९९२ मध्ये त्याची चुलत बहिण मायासाशी लग्न केले. मायासा ही दिलीप कुमार यांची बहीण फौजिया यांची मुलगी होती. फौजियाबद्दल असे म्हटले जाते की, कॉलेजमध्ये असताना तिचे सलमान खानवर प्रेम होते. नंतर फौजियाने अस्लम खानशी लग्न केले.
अयुबने १० वर्षांच्या लग्नानंतर पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि २०००मध्ये निहारिका भसीनशी लग्न केले. निहारिका ही कॉस्च्युम डिझायनर आहे. ‘रॉक ऑन’ व ‘द डर्टी पिक्चर’सारख्या चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. अयुब व निहारिका कॉलेजमध्ये एकत्र शिकले आणि तिथेच त्यांची भेट झाली. निहारिका अभ्यासासाठी अमेरिकेत गेली आणि दोघांनी वेगवेगळ्या लोकांशी लग्न केले, पण नंतर दोघांनीही आपल्या जोडीदाराला घटस्फोट देऊन एकमेकांशी लग्न केले. अयुब-निहारिका यांना जोहरा खान व ताहुरा खान या दोन मुली आहेत. लग्नाच्या १६ वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते दोघे वेगळे झाले.