आपल्या मनमोहक हास्याने व मनमोहक सौंदर्याने मराठीसह हिंदी प्रेक्षकांवर मोहिनी घालणारी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी मनोरंजन सृष्टीतली ही लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली असून यंदाचा गुढीपाडवा या जोडप्यासाठी खास आहे.
यंदाचा हा गुढीपाडवा पूजा सावंतसाठी खास आहे, कारण लग्नानंतरचा त्यांचा हा पहिलाच पाडवा आहे. पूजाने गुढीपाडव्याच्या सणानिमित्त खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीचा लग्नानंतर हा पहिला गुढीपाडवा असून परदेशात आपल्या पतीबरोबर तिने हा सण साजरा केला आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर गुढीपाडव्यानिमित्त काही खास फोटो व शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघांचा मराठमोळा व पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे.
पूजाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. पूजाने नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगूळसूत्र असा अगदी पारंपरिक लुक केला आहे. तर तिचा नवरा सिद्धेशनेदेखील पूजाच्या साडीला साजेसा असा कुर्ता परिधान केला असल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. पूजाने गुढीबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. त्याचबरोबर तिने आजच्या गुढीपाडव्यानिमित्त डाळ, भात, खीर, बटाट्याची भाजी असा खास बेतही केला असून याचा फोटोदेखील तिने शेअर केला आहे.
दरम्यान, पूजा सावंतने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच तिच्या अनेक चाहत्यांनी तिला गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. लग्नानंतर पूजा परदेशात गेली असून पूजा परदेशातही आपले सण-समारंभ साजरे करत आहे. मराठी संस्कृती जपत आहे, यामुळे तिच्या अनेक चाहत्यांकडून तिचे कौतुक केले जात आहे.