Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांच्या लग्नाच्या अचानक समोर आलेल्या फोटोंनी साऱ्यांनाच धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच ही जोडी लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नसोहळ्यात अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. अनेकांनी या जोडीचं भरभरून कौतुक केलं, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर काहींनी दोघांना ट्रोलही केलेलं पाहायला मिळालं. लग्नानंतर पियुष व सुरुची विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत.
सुरुची अडारकरचं हे पहिलं लग्न आहे. तर पियुषने तिसऱ्यांदा लगीनगाठ बांधली आहे. यावरून पियुष व सुरुची यांना नेटकऱ्यांनी बरंच ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. सुरुची व पियुष यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी पोस्ट केली. या पोस्टवर अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. सुरुची-पियुष यांनी लग्नानंतर प्रथमच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल व लग्न होताच त्यांना सोशल मीडियावर मिळालेल्या प्रतिसादावर खुलेपणाने संवाद साधला.
लग्नानंतर तुम्हाला बऱ्याच चांगल्या वाईट कमेंट आल्या पण तुम्ही कमेंट सेक्शन बंद केलं नाही असा प्रश्न सुरुची व पियुष यांना विचारला असता यावर उत्तर देत सुरुची म्हणाली, “आम्ही आमचं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवलं, मात्र आम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत तिथे आमचे प्रचंड चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरून लग्नाचा फोटो काळजीपूर्वक पोस्ट करावा आणि चाहत्यांच्या शुभेच्छा मिळाव्या त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आमच्या लग्नाचे फोटो मी अत्यंत आदराने पोस्ट केले. बऱ्याच जणांनी कमेंट सेक्शन बंद करण्याचा सल्लाही दिला, मात्र मी तसं केलं नाही कारण मला माझ्या चाहत्यांच्या शुभेच्छा वाचायच्या होत्या” असंही ती म्हणाली.
यावर पियुष म्हणाला, “सिनेसृष्टीत अशी बरीच मंडळी आहेत ज्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना मनापासून शुभेच्छा द्यावा असं वाटलं तेव्हा ते कमेंटद्वारे व्यक्त झाले. मी कसा आहे, मी कस जगतो यासाठी मला कोणाचंही सर्टिफिकेट नको आहे. माझं आयुष्य आहे तर ते मी माझ्या पद्धतीने जगणार. आणि हिचं आयुष्य तिने तिच्या तर्हेने जगावं. लग्नझाल्यानंतर आम्ही कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. आम्ही केवळ एकमेकांना उत्तर द्यायला बांधील आहोत. हे कमेंट वगैरे सर्व फुकट आहे म्हणून केवळ लोक करत आहेत”असं म्हणत नेटकऱ्यांना चांगलंच उत्तर त्याने दिलं आहे.