जॉनी डेपच्या ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ या चित्रपटात काम करणारा हॉलिवूड अभिनेता तामायो पेरी याच्या निधनाची बातमी नुकतीच समोर आली आहे. समुद्रात शार्कच्या हल्ल्यामुळे हा मृत्यू झाला आहे. वयाच्या ४९व्या वर्षी अभिनेत्याला त्याचा जीव गमवावा लागला. अभिनेता असण्याबरोबरच तामायो हा हवाईमध्ये लाइफगार्ड व सर्फिंग ट्रेनर म्हणून काम करत होता. तो ‘ब्लू क्रश’ आणि ‘चार्लीज एंजल्स’ सारख्या चित्रपटांसाठीही प्रसिद्ध होता. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना आणि चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. (Tamayo Perry Passed Away)
होनोलुलु इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसने तामायो पेरीच्या दुःखद मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्काय न्यूजनुसार, हवाईच्या ओआहूजवळील गोट आयलंडजवळ तामायोवर शार्कने हल्ला केला. तामायोला रक्तस्त्राव होत असल्याचं एका व्यक्तीने पाहिलं आणि तातडीने आपत्कालीन सेवांना याबाबतची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून त्याला जेटस्कीवरुन समुद्रकिनारी आणले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
रिपोर्ट्सनुसार, तामायो पेरीच्या शरीरावर शार्कच्या चावा घेतल्याच्या खुणा होत्या. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर, समुद्र सुरक्षा अधिकाऱ्यांनी परिसरात शार्कची चेतावणी पोस्ट केली आहे. तामायोने लाइफगार्ड ड्युटीमधून काही काळ ब्रेक घेतला होता आणि सर्फिंगला प्राधान्य दिलं होतं. दरम्यान, उत्तर किनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या पेरीने जुलै २०१६ मध्ये महासागर सुरक्षा विभागातून आपल्या करिअरची सुरुवात केली, असे देखील स्काय न्यूजने सांगितले. उत्तर किनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्या तामायोने जुलै २०१६ मध्ये महासागर सुरक्षा विभागातून करिअरची सुरुवात केली.