‘पारू’ या मालिकेत आलेलं रंजक वळण साऱ्यांच्याच पसंतीस पडलं. अहिल्यादेवींचा जीव वाचवून पारुने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला असतो. मात्र या संकटातून अहिल्यादेवी पारूची मदत करतात. एकच रक्तगट असलेल्या अहिल्यादेवी पारुला रक्त देऊन तिचा जीव वाचवतात तर केलेल्या उपकारांची कर्जफेड म्हणून अहिल्यादेवी पारुसाठी हे सर्व करतात. पारुला आता शुद्ध आलेली असून ती बऱ्यापैकी बरी झालेली असते त्यामुळे तिला डॉक्टर डिस्चार्ज देतात त्यानंतर आदित्य, सावित्री पारूला घेऊन किर्लोस्कर मेन्शनवर येतात. त्यावेळेला मारुती पारुची खूप काळजी करताना दिसतो. (Paaru Marathi Serial)
मारुती पारुचे पाय धुवून माझी लक्ष्मी आली असं म्हणत तिचं स्वागत करतो तर एकीकडे दिशा व दामिनी एकमेकींचे कान भरत असतात. दामिनी दिशाला बोलण्याची एकही संधी सोडत नाही त्यामुळे दिशाचा पारा चढत असतो. दामिनी दिशाला म्हणते की, आता होणाऱ्या सूनेपेक्षा मोलकरीण या लोकांना जास्त प्रिय आहे. ती गावाकडून आली आहे त्यामुळे तिला या सगळ्या आलिशान गोष्टींचा मोह असणार त्यामुळे ती चांगलं वागून सगळ्यांच्या मनात जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे ऐकून दिशा आणखीनच रागावते तर इकडे आदित्य हा पारूचा विचार करत असतो.
आणखी वाचा – ‘पारू’च्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला पाहिलंत का?, अभिनेत्रीचा नवरा करतो हे काम
तितक्यात तिथं प्रीतम येतो आणि म्हणतो की, तू पारूचा विचार करत आहेस ना, हे ऐकून आदित्यला धक्काच बसतो आणि आदित्य होकार देतो. तेव्हा प्रीतम म्हणतो की, आपल्या जवळच्या व्यक्तींचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. जसं आई नसली की मला आईची आठवण येते, तू नसला की तुझी आठवण येते, आता पारू नाही आहे तर मला पारूची आठवण येते पण आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. हे ऐकून आदित्यला कळतच नाही की तो नेमका पारूचा विचार का करत आहे. त्यानंतर इकडे पारूला अहिल्यादेवींना भेटायचं असतं म्हणून ती वाड्यावर येते. तेव्हा आदित्य तिला थांबवतो आणि सांगतो की तुला आता आरामाची खूप गरज आहे तू आधी आराम करून घे आणि आपण नंतर आईला भेटूया असं म्हणून तो तिला अडवून एका जागी बसवतो.
हे सर्व काही दामिनी आणि दिशा पाहत असतात तेव्हा दामिनी म्हणते की, किर्लोस्कर मेन्शनचा मालक एका मोलकरणीच्या कसं मागे मागे करतोय ते बघ. हे ऐकून दिशा काहीच बोलत नाही. दिशाचा अबोलपणा आता कोणता नवा डाव आखणार?, दिशा व दामिनी पारूविरुद्ध नवी कोणती चाल चालणार?, हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.