आपल्या जादुई संगीताने अवघ्या जगाला वेड लावणारा गायक व संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान. रहमान यांनी संगीतविश्वामध्ये अमूल्य असं योगदान दिलं असून दाक्षिणात्य तसंच हिंदी सिनेमाविश्वात त्यांचे संगीत विशेष लोकप्रिय आहेत. परदेशातही त्यांच्या गाण्यांची एक वेगळी क्रेझ आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी रसिकांच्या मनात आणि ओठांवर आहेत. अशातच त्यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे ए. आर. रहमान व त्यांची पत्नी एकमेकांपासून विभक्त होणार आहेत. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान २९ वर्षांच्या लग्नानंतर पत्नी सायरा बानोपासून वेगळे होणार आहेत. (A. R. Rahman Divorce)
रहमान आणि सायरा यांच्या वकिलाने एक जाहीर निवेदन जारी करून सांगितलं की, या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. रहमान यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, या नात्यात तिला खूप वेदना होत होत्या, जे सांभाळणे तिच्यासाठी खूप कठीण झालं आहे. त्यामुळे आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडप्याचा विभक्त होण्याचा निर्णय हा अचानक घेतलेला निर्णय नाही. बराच वेळ विचार करून आणि समजून घेतल्यानंतर सायरा या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे. सायराने प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, “ती आता हे नातं वाचवू शकत नाही”.
इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, “लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायरा यांनी त्यांचे पती ए. आर. रहमानपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या नातेसंबंधातील महत्त्वपूर्ण भावनिक तणावानंतर घेतला आहे. एकमेकांवर त्यांचं नितांत प्रेम असूनही, या जोडप्याला असं आढळून आलं की, तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. जी दोघांना भरून काढता आलेली नाही”. सायरा यांनी वेदना आणि त्रासामुळे हा निर्णय घेतल्याचे आवर्जून सांगितलं. सायरा या आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयतेची अपेक्षा व्यक्त करतात, कारण ती तिच्या आयुष्यातील या कठीण काळातून जात आहे.
दरम्यान, ए. आर. रहमान आणि सायरा यांचा विवाह १९९५ मध्ये झाला होता. दोघांना खतिजा, रहीमा, आमेन अशी तीन मुलं आहेत. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटासाठी ऑस्कर जिंकणारे संगीतकार ए. आर. रहमान हे भारतातील महान संगीतकार आहेत. आजवर त्यांनी अनेक बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपटांना संगीत दिले आहे. अशातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या बातमीमुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे.