ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो लग्नाच्या २९ वर्षांनी वेगळे होत आहेत. त्यांच्या वकिलाने मंगळवारी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी याबद्दलची माहिती दिली. या जोडप्याच्या वतीने दिलेल्या निवेदनात घटस्फोटाच्या वकील वंदना शाह यांनी सांगितले की, “त्यांच्या नात्यातील अत्यंत भावनिक ताणानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे”. यानंतर आता स्वत: ए. आर. रहमान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ए. आर. रहमान यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर एक पोस्ट शेअर करत पत्नीपासून विभक्त होण्यावर भाष्य केलं आहे. (A. R. Rahman on Separation)
एक्सवरील पोस्टमध्ये ए. आर. रहमान यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला वाटलेलं की आम्ही ३० वर्षे पूर्ण करु. परंतु आता असे दिसते की, या सर्व गोष्टींचा अदृश्य शेवट आहे. तुटलेल्या अंतःकरणाच्या वजनाने देवाचे सिंहासन देखील हलू शकते. तरीही, या विखुरण्यात आपण अर्थ शोधत असतो. भलेही मग त्या तुकड्यांना त्यांची जागा पुन्हा मिळत नाही. माझ्या मित्रांनो, आम्ही या नाजूक काळातून जात असताना आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद”. या पोस्टखाली रहमान यांच्या अनेक चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
“We had hoped to reach the grand thirty, but all things, it seems, carry an unseen end. Even the throne of God might tremble at the weight of broken hearts. Yet, in this shattering, we seek meaning, though the pieces may not find their place again. To our friends, thank you for…
— A.R.Rahman (@arrahman) November 19, 2024
रहमान आणि सायरा यांच्या वकिलाने एक जाहीर निवेदन जारी करून सांगितलं की, या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. रहमान यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, या नात्यात तिला खूप वेदना होत होत्या, जे सांभाळणे तिच्यासाठी खूप कठीण झालं आहे. त्यामुळे आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बराच वेळ विचार करुन आणि समजून घेतल्यानंतर सायरा या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे.
आणखी वाचा – संगीतकार ए. आर. रहमान पत्नीपासून विभक्त होणार, लग्नाच्या २९ वर्षांनी घटस्फोटाचा निर्णय, नेमकं काय बिनसलं?
दरम्यान, सायरा बानो आणि ए. आर. रहमान यांचा विवाह १९९५ मध्ये झाला होता आणि त्यांना तीन मुले आहेत. दोन मुली खतिजा, रहीमा आणि मुलगा अमीन. सायरा बानो व रहमान दोघेही बराच वेळ त्यांच्या नात्याचा विचार करत होते. घाईघाईत कोणताही निर्णय झालेला नाही अशा भवन त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच सायराने प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, ती आता हे नाते वाचवू शकत नाही. त्यामुळे वेगळे होणे त्यांना योग्य वाटले.