सध्याच्या या सोशल मीडियाच्या काळात कुणीही नवखा व्यक्ती अगदी रातोरात स्टार होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना अगदी एका रात्रीत प्रसिद्धी, लोकप्रियता त्याचबरोबर पैसेदेखील मिळतात. असाच रातोरात लोकप्रिय झालेला सोशल मीडिया स्टार म्हणजे ओरी अर्थात ओराहन अवत्रामणी. बॉलिवूडमधील अनेक मोठमोठ्या कलाकारांपासून ते अगदी उद्योगपतींपर्यंत आणि अनेक स्टारकिड्सपासून ते राजकारण्यांबरोबर ओरी सध्या दिसत आहे. नुकतंच त्याने ‘बिग बॉस’मध्येही प्रवेश केला होता. (Ory On Instagram)
‘बिग बॉस’च्या घरातील त्याचा प्रवेश चांगलाच चर्चेचा विषय ठरला. पण त्याने एका दिवसातच घरातून काढता पाय घेतला. त्याच्या अचानक येण्याने तो घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आला असल्याचं सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं. मात्र तो घरातील सदस्यांच्या मनोरंजनासाठी खास पाहुणा म्हणून आला होता. यावेळी ओरीने सलमानला तो अनेक बॉलिवूड पार्ट्यांना हजर राहून सेलिब्रिटींबरोबर फोटो काढतो आणि या फोटोद्वारे त्याला पैसे मिळतात असे सांगितले होते. त्याच्या या वक्तव्यावर स्वत: सलमानही अवाक् झाला होता.
दरम्यान, सोशल मीडियावर ओरीचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्यात तो वेगवेगळ्या पोजेस देत फोटो काढताना दिसतो. अशातच नुकत्याच झालेल्या ‘ऑर्चीस’ चित्रपटाच्या प्रिमियर सोहळ्याला त्याने हजेरी लावली होती. यावेळी त्याने सुहाना खान, कतरिना कैफ, खुशी कपूर, जान्हवी कपूर, आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, मलायका अरोरा, अमृता अरोरा, आयुष्मान खुराना, आणि भूमी पेडणेकर आदि बॉलिवूड कलाकारांबरोबर फोटो काढले.
हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या पोजेसमधील फोटोची चर्चा होत आहे. या फोटोत त्याने काही कलाकाकरांच्या छातीवर हात ठेवला आहे तर काही कलाकरांच्या पोटावर हात ठेवत फोटो काढले आहेत. या फोटोखाली कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी “त्याला खरंच या पोजमध्ये फोटो काढण्यासाठी पैसे मिळतात का?” असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी त्याच्या या फोटो काढण्याच्या अनोख्या पद्धतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे.