देशभरात सध्या आयपीएलचे वारे वाहत आहेत. २००८ साली सुरु झालेल्या आयपीएलचा आता नवा सीजन २२ मार्च ते २६ मे दरम्यान होणाऱ्या मॅचमध्ये या वेळी कोणता संघ बाजी मारणार हे पाहाण्यासारखं आहे. क्रिकेटचा व भारताचा जुना संबंध आहे. आयपीएलच्या निमित्ताने आता बॉलिवूडदेखील एकत्रित आल्याचे पाहायला मिळत आहे. २००८ पासून सुरु झालेल्या आयपीएलच्या दरम्यानचे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात. अभिनेता शाहरुख खानचा वानखेडे स्टेडियममध्ये झालेला प्रकार आजही क्रिकेटरसिकांच्या लक्षात आहे. असेच काही किस्से आहेत ते आपण जाणून घेऊया. (IPL Match moments)
अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या अभिनयामुळे अधिक चर्चेत असतो. त्याचप्रमाणे तो आयपीएल पहिल्या सीजनपासूनच केकेआर संघाचा सहमालक आहे. तो अनेकदा संपूर्ण कुटुंबासह मॅचचा आनंद घेताना दिसला आहे.त्याचप्रमाणे त्याने एकदा मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सुरक्षारक्षकाबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याला काही वर्षांसाठी या स्टेडियमवर येण्यासाठी बंदी घातली होती.
त्यानंतर भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा आरसीबी संघातून खेळत असतो. त्याच्या प्रत्येक मॅचच्या वेळी त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमी त्याला चीयर करताना दिसते. तो भारताच्या बाजूने खेळत असला किंवा आयपीएलमध्ये खेळत असला तरीही अनुष्का नेहमी त्याला प्रोत्साहन देताना दिसते.
अभिनेत्री प्रीती झिंटा ही पंजाब किंग्सची सहमालक आहे. ती नेहमी आपल्या टीमला जोशभरात प्रोत्साहन देताना दिसते. २०१७ साली प्रीती व अभिषेक बच्चन यांना एकत्रितपणे मॅच बघताना पाहिले गेले आहे. ते अनेकदा सेल्फी घेताना दिसतात तसेच एकमेकांची मस्करी करतानादेखील दिसतात. मजेशीर गोष्ट म्हणजे दोघेही वेगवेगळ्या संघांना प्रोत्साहन देत असतात.
क्रिकेट विश्वात कधीही काहीही होऊ शकते याचा प्रत्यय अनेक मॅचच्या दरम्याने येत असतो. त्यातील एक प्रकार म्हणजे २०१८ साली सुपरस्टार सलमान खान व अनिल कपूर या दोघांनीही चेन्नई सुपर किंग्स व सनराइजर्स हैद्राबादमध्ये झालेल्या मॅचची कॉमेंट्री केली होती. त्यांची कॉमेंट्रीला प्रेक्षकांना खूप प्रतिसाद दिला होता.