‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री अनघा अतुलने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीने स्वतःच हॉटेल सुरु करणार असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली. आणि तिच्या नव्या हॉटेलचा शुभारंभ केला. अनघाच्या नव्या हॉटेलचं नाव ‘वदनी कवळ’ असून पुण्यातील डेक्कन परिसरात हे हॉटेल तिने सुरु केलं आहे. अनघाच्या या हॉटेलच्या शुभारंभानिमित्त तिच्या कलाकार मित्र मंडळींनी हजेरी लावत या सोहळ्याची रंगत वाढविली. अशातच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने अनघाच्या या नव्या हॉटेलध्ये भोजनाचा आस्वाद घेतला. (Reshma Shinde Troll)
अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने अनघाच्या हॉटेलमध्ये हजेरी लावली. रेश्माने अनघाच्या हॉटेलधील जेवणाचा आस्वाद घेण्याआधी ‘वदनी कवळ’ श्लोक म्हटला. अभिनेत्रीने यांची खास झलक व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. शिवाय तिने या व्हिडिओबरोबर कॅप्शन देत म्हटलं आहे की, “आपल्या बिझी शेड्युलमध्ये आपलं सतत बाहेरचं खाणं होतं. मग तुम्हाला कधी अस वाटतं? आत्ता छान घरचं जेवण हवंय. वाटतं ना? मग पुणेकरांचा हा प्रश्न सुटलाय. अगदी घरच्या जेवणाची आठवण करु देणारं ‘वदनी कवळ‘ हे हॉटेल पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे. सुग्रस, सात्विक भोजनाचा आनंद घ्यायचा असेल तर ‘वदनी कवळ’ला नक्की भेट द्या!”
रेश्मा पुढे असंही म्हणाली आहे की, “मी या भोजनाचा आस्वाद घेतलाय, तुम्ही सुध्दा घ्या. तुम्ही निराश होणार नाही याची खात्री आहे. अनघा व अखिलेश नवीन व्यवसायासह आपण आपली स्वतःची एक नवीन ओळख तयार करणार आहात. मला तुमचा अभिमान आहे. तुमचे हे नवीन कार्य तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचवणारं एक धाडसी पाऊल आहे, याबद्दल तुमचे कौतुक! अनघा माझी साथ व प्रेम कायमच तुझ्याबरोबर आहे. तळटीप : मला पूर्ण वदनी कवळ येतं. एखादा शब्द चुकू नये म्हणून हा प्रयत्न!”

रेश्माने शेअर केलेल्या या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. रेश्माने इतर मित्र मंडळींसह अनघाच्या हॉटेलला हजेरी लावली तेव्हा जेवणाआधी त्यांनी वदनी कवळ हा श्लोक म्हटला, यावरून रेश्मा आणि तिच्या मित्र मंडळींना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “एवढं किंचाळण्यापेक्षा न म्हटलेलं बरं.”, तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, “अन्न हे पुर्ण ब्रम्ह आहे ना, मग इतके किंचाळत का प्रार्थना करताय? जरा आदर ठेवा त्या पूर्णब्रम्हा बद्दल” असं म्हणत त्यांना खडेबोल लगावले आहेत. तर आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “आदराने म्हटलं पाहिजे, मस्करी वाटते. निदान सेलिब्रिटींनी तरी पाळावी ही अपेक्षा” असं म्हटलं आहे. तर अनेकांनी ‘किंचाळताय कशाला’, ‘टिंगल सुरु आहे’ अशा कमेंट करत त्यांना धारेवर धरलं आहे.