झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत सतत ट्विस्ट येत असतात. मालिकेचे कथानक आणि एजे व लीला ही पात्रे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अशातच या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून यश व श्वेताच्या लग्नाची तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. हे लग्न स्वत: एजेने ठरवले आहे. यशचे लीलाची बहीण रेवतीवर प्रेम असते. मात्र, दुर्गाच्या दबावामुळे यश व रेवती एजेला खरे सांगत नाहीत. आता मात्र मालिकेत ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे यश श्वेताबरोबरच्या साखरपुड्यातून गायब झाला आहे. अशातच आता या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे तो म्हणजे लीला किंवा एजेंच्या सूना बाहेर जाण्याचा. (Navri Mile Hilerla Serial Updates)
एजेंच्या सूनांनी त्यांना सांगितले आहे की एक तर या घरात लीला राहील किंवा आम्ही. याचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला जहांगीर कुटुंबातील सर्व जण एकत्र जमल्याचे पाहायला मिळत आहे. दुर्गा म्हणते, “एक तर ही मुलगी या घरात राहील किंवा मी राहीन. तुम्हाला निवड करावीच लागेल एजे. लीलाला बायकोचं स्थान द्यायचं आहे की सुनेला तिचा हक्क द्यायचा आहे”.
यापुढे लक्ष्मी म्हणते की, “आम्हाला लीला या घरात नको आहे”. यानंतर सरस्वती म्हणते, “तिला घराबाहेर काढा” आणि त्या तिघी एकत्र म्हणतात, “नाही तर आम्ही हे घर सोडू.” त्यावेळी एजेचा मुलगा असे विचारतो की, तुम्हा सगळ्यांना मान्य असेल, तर आपण घरातल्या घरात व्होटिंग घेऊ? त्यानंतर सगळे जण एकेक चिठ्ठी टेबलवर ठेवताना दिसत आहे. एजेंच्या सूनांनी लीलाविरुद्ध हा निर्णय नेमका कशामुळे घेतला आहे?
आणखी वाचा – चाहतीने काढला माधवी निमकरच्या नावाचा टॅटू, अभिनेत्रीला ‘ते’ दृश्य पाहून भावना अनावर, म्हणाली, “हा क्षण..”
तसंच आता एजे लीलाला बाहेर काढणार का? आणि यश व रेवती यांच्या लग्नाचे पुढे काय होणार? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागातून पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या नवीन प्रोमोखाली प्रेक्षकांनी त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “काय मूर्खपणा लावला आहे”, “किती वेळा बाहेर काढणार”, “आता नक्की कोण बाहेर जाणार’ अशा अनेक् प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.