आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चाहत्यांबरोबरच्या वागणुकीदरम्यानचा नसीरुद्दीन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चित्रपटांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत ठसा उमटवणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा विमानतळावर ते फार कमीवेळा स्पॉट होताना दिसतात.अशातच विमानतळावर स्पॉट होताच त्यांच्या चाहत्यांनी सेल्फीसाठी त्यांच्याभोवती गर्दी केली. दरम्यान नसीरुद्दीन शाह त्यांच्यावर चिडलेले दिसले. (Naseeruddin Shah Angry)
नसीरुद्दीन शाह ‘शोटाइम’साठी चर्चेत आले आहेत. ते दिल्ली विमानतळावर दिसले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि हातात पुस्तक होते. त्यानंतर सेल्फीसाठी चाहत्यांनी त्यांना घेरले तेव्हा त्यांनी सेल्फी घेण्यास नकार दिला. आणि ते चाहत्यांवर संतापले. चाहत्यांना ते ओरडतानाही दिसले. व्हिडीओमध्ये नसीरुद्दीन शाह ओरडत आहेत, “तुम्ही लोकांनी खूप चुकीचं काम केलं आहे. डोकं फिरवण्याची काम तुम्ही करत आहात. एखादा माणूस कुठे जात असेल तेव्हाही तुम्ही त्याला सोडत नाहीत. तुम्हाला का समजत नाही?”, असं बोलत ते चाहत्यांवर चिडताना दिसले. यानंतर व्हिडीओमध्ये मागून कोणाचा तरी आवाज येतो की, “जाऊदे मित्रा, काही करु नकोस. असू दे, त्यांनी नकार दिला आहे तर”.
अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओवर युजर्सकडून भरभरून प्रतिक्रिया मिळत आहेत. हा व्हिडीओ पाहून कुणी नसीरुद्दीन शाह यांच्यावर रागावले आहे, तर कुणी त्यांच्या वाढत्या वयामुळे असं करत असल्याचं म्हटलं आहे. एकाने लिहिले आहे की, “ही अतिशय वाईट वागणूक आहे. आपले स्टारडम हे प्रेक्षकांमुळेच आहे हे त्याने विसरू नये”. तर आणखी एका युजरने, “तुमचा चेहरा चांगला नसता, तर तुम्ही चांगले बोलले असता”, असं म्हटलं आहे.
मात्र, अनेक युजर्सनी नसीरुद्दीन शाह यांची बाजू घेत त्यांच्या वयामुळे त्यांची वागणूक बिगडली असल्याचं म्हटलं आहे, अशा परिस्थितीत त्यांना एकटे सोडले पाहिजे, असेही काहीजण बोलत आहेत. तर एका युजरने असंही म्हटलं की, “नसीरुद्दीन एक अप्रतिम अभिनेता आहे आणि त्याने कधीही स्टारडमची पर्वा केली नाही. प्रसिद्धीसाठी तो काहीही करत नाही”.