Pritam Chakraborty News : आठ दिवसांच्या सततच्या तपासानंतर, मुंबईतील मालाड पोलिसांनी संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओमधून ४० लाख रुपयांची बॅग चोरणाऱ्या ऑफिस बॉयला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चोरीला गेलेल्या एकूण रोख रकमेपैकी ९५% रक्कमही जप्त केली आहे. सूत्रांनी सांगितले की, अटक केलेल्या आरोपीचे नाव आशिष बुटीराम सायल असे आहे, तो ३२ वर्षांचा आहे. संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी सायलला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी प्रीतम चक्रवर्तीच्या स्टुडिओमध्ये नऊ वर्षांपासून ऑफिस बॉय म्हणून काम करत होता आणि ४ फेब्रुवारी रोजी त्याने प्रीतम चक्रवर्तीच्या घरी सामान पोहोचवण्याच्या बहाण्याने स्टुडिओमधून ४० लाख रुपये असलेली बॅग चोरली आणि नंतर पळून गेला.
मालाड पोलिसांनी सांगितले की, गुन्हा दाखल केल्यानंतर दुकाने, आस्थापने, हॉटेल्स, इमारती इत्यादी ठिकाणी बसवलेल्या सुमारे १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर असे आढळून आले की बॅग चोरल्यानंतर आरोपी ऑटो रिक्षा घेऊन कांदिवली परिसरात गेला होता. तिथून तो काही किलोमीटर चालला आणि नंतर मार्वे रोडवरून दुसरी ऑटो रिक्षा पकडली.तो कांदिवली पश्चिमेला गेला तेथून मालवणीला चालत गेला आणि नंतर चारकोप परिसरात पोहोचला आणि तिथून तो चारकोप गावात चालत गेला.
आणखी वाचा – घटस्फोटानंतर क्रिकेटपटू युजवेंद्र चहल पत्नीला देणार ‘इतके’ कोटी, पोटगीच्या रकमेवरही कर आकाराला जातो का?
त्यानंतर आरोपीने तिसरी ऑटो रिक्षा घेतली आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील समता नगर भागात उतरला. तिथून तो चौथी ऑटो रिक्षा घेऊन वर्सोवाला पोहोचला. अशाप्रकारे, आरोपी रात्रभर फिरत राहिला आणि एकामागून एक चार ऑटो रिक्षा बदलत राहिला. तपासादरम्यान, आरोपी जम्मू आणि काश्मीरमध्ये लपून बसल्याचे आढळून आले, त्यानंतर मुंबई पोलिसांचे एक पथक जम्मू आणि काश्मीरमध्ये पोहोचले. दोन दिवस त्याचा शोध घेतला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आरोपीला अटक केल्यानंतर, त्याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना ३४,१५,००० रुपये रोख सापडले आणि आरोपीने २,८७,००० रुपयांचा आयफोन आणि लॅपटॉप खरेदी केला असल्याचं समोर आलं. या दोन्ही वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात उर्वरित रकमेचा शोध मुंबई पोलिस घेत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.