Akshata Aapte On Chhaava Movie : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे छावा या सिनेमाची. आठवड्याभरात २०० कोटींचा टप्पा पार करत या चित्रपटाने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच धुमाकूळ घातला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या सिनेमात विकी कौशल महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा सिनेमा असून यांत विकी कौशल व रश्मीने मंदानाच्या भूमिकांनी साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. आजवर या चित्रपटाची क्रेझ पाहता सर्वसामान्यांबरोबरच कलाकार मंडळींनीही भरभरून कौतुक केलं. अनेक बॉलिवूड तसेच मराठी कलाकारांनी चित्रपट पाहून प्रशंसा केली. दरम्यान मालिकाविश्वातील एका अभिनेत्रीने चित्रपट पाहून त्याची स्तुती करण्याबरोबरच चित्रपटात खटकलेल्या गोष्टी पोस्ट स्वरूपात दिल्या आहेत.
‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत लीलाला त्रास देणाऱ्या श्वेताचे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षता आपटे हिने ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली की, “‘छावा’बद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा आपण एकदाच पाहू शकतो असा आहे. जे आपल्याला आधीच माहिती आहे तेच दाखवले. पहिला भाग एवढं काही नाही, पण दुसरा भाग छान आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे पण स्क्रिप्ट चांगली नाही. सिनेमाचं म्युझिक म्हणजे बिग नो. अजिबात चांगल नाही. दिग्दर्शन चांगलं पण आहे आणि वाईट पण. कॉस्च्युम आणि हेअर मेकअप फार छान आहे”.

पुढे तिने लिहिलं आहे की, “विकी कौशलने खूप उत्तम भूमिका साकारली आहे. अक्षय खन्ना सुद्धा विकी कौशलच्या तोडीस तोड अभिनय करतोय. पण रश्मिका मंदाना यासाठी अजिबात योग्य नाही. बाकीचे सहाय्यक कलाकार उत्तम आहेत. एकंदरीत मनोरंजन म्हणून पाहण्यासाठी हा एक चांगला सिनेमा आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्याबद्दल अजून जाणून घ्यायच्या अपेक्षा होती. इतर प्रेक्षकां प्रमाणेच मला सुद्धा शेवटचा क्षण पाहून खूप रडू आलं पण चित्रपटाच्या प्रभावामुळे असं झालेलं नाही. आपण महाराजांचा आदर करतो म्हणून आपल्या भावना दाटून आल्या. दुर्दैवाने सिनेमात रश्मिकाचा तोच एक्सेंट ऐकायला येतो”.
आणखी वाचा – महाराष्ट्र सायबर सेलकडून राखी सावंतला समन्स, ‘या’ दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
यापुढे तिने असंही लिहिलं आहे, “तिची अभिनय करण्याची स्टाईल सुद्धा आपण साउथ सिनेमांमध्ये पाहिली तशीच आहे. त्यामुळेच तिला महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत स्वीकारणं अजिबात जमत नाहीये. विकी कौशलने या चित्रपटात उत्तम काम केले आहे त्याला त्या रूपात आपण यापूर्वी पाहिलं नाहीये. स्क्रिप्टमध्ये आणखी वैविध्यपूर्णता असती तर त्याला आणखी वेगळ्या पद्धतीने दाखवण्याची संधी मिळाली असती. सिनेमात खूप कमी संवाद मराठीत दाखवले आहेत. त्यांनी हा सिनेमा मराठी मध्ये का बनवला नाही? मराठी लोकांना आणखी कनेक्ट होता आलं असतं”, असं म्हणत चूक नमूद केल्या आहेत.