‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांकच्या या मालिकेतली श्री या भूमिकेला विशेष ओळख मिळाली. त्यानंतर शशांकने बऱ्याच छोट्या पडद्यावरील मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली. शशांक अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नेहमीच तो सोशल मीडियावरून काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. (Shashank Ketkar Anniversary)
शशांकने वैयक्तिक आयुष्यात ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न केलं. पुण्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता हे कपल पालकत्वाचा टप्पा एन्जॉय करत आहेत. व्यवसायाने वकील असलेली प्रियांका व अभिनेता शशांक लग्नाआधी अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शशांकने पत्नीसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. शशांकने ही खास पोस्ट शेअर करत बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शशांकने पोस्ट शेअर करत लाडक्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटलं आहे की, “बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला खूप शुभेच्छा. आज मी जो काही आहे तो फक्त तुझ्यामुळे. तू माझ्यातील चिडक्या, भावुक, भांडणाऱ्या, व्यवहारी, अत्यंत तत्त्वनिष्ठ, कधी कधी खूप विचित्र वागणाऱ्या, कधी कधी प्रचंड त्रास देणाऱ्या, मस्ती करणाऱ्या शशांकला कायम सांभाळून घेतेस. म्हणूनच म्हणतोय तू आहेस म्हणून मी आहे” असं म्हणत त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत, “आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अजून खूप सारी स्वप्नं एकत्र बघू आणि पूर्णही करू” असंही त्याने म्हटलं आहे.
त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शशांक सध्या ‘मुरंबा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. शशांक व त्याची पत्नी प्रियांका यांची भेट एका कार्यक्रमादरम्यान झाली होती. यावेळी झालेल्या ओळखीचं रूपांतर कालांतराने मैत्रीत झालं आणि दोघांनी ४ डिसेंबर २०१७ साली लगीनगाठ बांधली. पेशाने वकील असलेली प्रियांका उत्तम नृत्यांगना देखील आहे.