‘होणार सून मी ह्या घरची’, ‘हे मन बावरे’ आणि आता सुरु असलेली ‘मुरांबा’ या सगळ्याच मालिकांमधून अभिनेता शशांक केतकरने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. शशांकने मालिकाविश्वातून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मराठी सिनेसृष्टीसह शशांकने हिंदी सिनेविश्वातही छाप पाडली. शशांकचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही शशांक नेहमीच सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. (Shashank Ketkar Fan Moment)
शशांकचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर असून नुकताच तो त्याच्या चाहत्यांना भेटला होता. या भेटीचा खास अनुभव शशांकने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. रविवारी सकाळी अशाच काही सफाई महिला कर्मचाऱ्यांनी शशांकला अगदी लगेच ओळखलं. या भेटीचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शशांक सोशल मीडियावर बरेचदा सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतो. शिवाय तो बरेचदा चाहत्यांबरोबरचे अनुभवही शेअर करतो.
शशांकने त्याच्या सोशल मीडियावर सफाई महिला कर्मचाऱ्यांना भेट देतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. “मी एक कलाकार म्हणून नेहमी हेच म्हणतो, मायबाप प्रेक्षक आहेत म्हणून मी आहे. माझ्यासाठी माझा प्रेक्षक सगळ्यात महत्वाचा. प्रेक्षकांना काम, व्यक्तिरेखा आवडते म्हणून ते त्यांच्या मनात, घरात स्थान देतात. आज, रविवार सकाळचा एक गोडं अनुभव. आपलं शहर स्वच्छ राहावं यासाठी रोज रस्ता झाडून घेणाऱ्या या ताई, मला बघून किती गोड हसल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं निरपेक्ष हसू पाहून मी ही आपसूक हसलो आणि आनंदलो. देवा हे प्रेम कधीही कमी होऊ देऊ नकोस”, अशी पोस्ट शेअर करत शशांकने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
शशांक केतकरने या व्हिडीओमध्ये संबंधित महिलांना त्यांची नावं विचारत असंच प्रेम कायम ठेवा, असं त्याने सांगितलं आहे. सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ‘मुरांबा’ या मालिकेतील भूमिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे.