वादग्रस्त विधान करत चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत केतकी चितळे हे नाव आवर्जून घेतलं जातं. केतकीने अभिनयक्षेत्रातून काढता पाय घेतला असला तरी अभिनेत्री सोशल मीडियावरुन प्रेक्षकांच्या संपर्कात असते. सपशेल मीडियावर केतकीचा मोठा वावर असलेला पाहायला मिळतो. केतकीने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टवर ती नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकलेली पाहायला मिळाली आहे. अशातच अभिनेत्रीने प्रजासत्ताक दिनादिवशी सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Ketaki Chitale Troll)
केतकीने एक व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत, “या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान कायदा, समान नियम नाहीत. आज ज्या दिवशी भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी महानगरपालिका भेदभाव करण्यासाठी लोकांना घरी पाठवून, दारं ठोठवून जात विचारत आहे. अब गाओ संविधान, संविधान” असं म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत केतकीने स्वतःचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
केतकीने शेअर केलेल्या या व्हिडीओत, केतकी जात विचारायला आलेल्या महिलेची चौकशी करताना दिसत आहे. ‘तुम्ही जात विचारायला का आला आहात?’ असं ती विचारते. यावर उत्तर देत ती महिला म्हणते की, ‘मराठा आरक्षणासाठी सर्व्हे सुरु आहे’. यावेळी ती महिला केतकीला ‘तुम्हीपण मराठा आहात का?’ असा प्रश्न विचारते. तेव्हा केतकी म्हणते, “अजिबात नाही. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे”. ती महिला गेल्यानंतर अभिनेत्री पुढे म्हणते की, “प्रत्येक नागरिकाला समान कायदा नाही आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा सर्व्हे सुरु आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?”
या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट करत अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. सध्या मराठा आरक्षण हा विषय चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. या दरम्यान अभिनेत्रीने केलेल्या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत, “तुम्ही पण मराठा आहेत का? असं विचारलं तर जितक्या झटकन ‘अजिबात नाही’ म्हणून ‘ब्राह्मण’ आहे असं सांगितलं. यावरून कळतं की तुमचा मराठा जातीबद्दल किती द्वेष आहे व स्वतःच्या जातीचा किती अभिमान आहे…तुम्हाला एवढा स्वतःचा जातीचा अभिमान आहे, तर मग इतरांना का असू नये?” असं म्हटलं आहे. या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देत केतकी म्हणाली, “मराठा जातीच्या विरोधात मी नाही. तुम्ही कितीही मला तसे रंगवायचा प्रयत्न केलात तरी मी तशी होत नाही. तुम्ही रंगवत राहा काल्पनिक कथा. मी मनोरंजन म्हणून वाचत राहते. सत्य खऱ्या मराठाला माहिती आहे की मराठा व ब्राह्मण हे १९९० पर्यंत एकच होते. कुणी तेढ निर्माण केली हे ही सर्वांना महिती आहे. आता मराठा समाजात कोण तेढ निर्माण करतंय हे ही सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या गटातील आहात, ते दाखवून दिल्याबद्दल तुमचे आभार.”