सार्वजनिक तसेच खासगी वाहनांनी प्रवास करताना बऱ्याचदा सर्वसामान्यांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागतो. शिवाय महाराष्ट्रातील काही भागातील रस्त्यांची परिस्थिती पाहता प्रवास करताना बऱ्याच अडचणी येतात. खड्ड्यांमुळे तर मुंबई सारख्या शहरांत रस्त्याची चाळण झाली आहे. याचा फक्त सर्वसामान्यांनाच नव्हे तर कलाकार मंडळींनाही त्रास होतो. याबाबत काही स्थरातील लोक बोलताना दिसतात. तसेच कलाकारही व्यक्त होतात. आता असंच काहीसं घडलं आहे. कामानिमित्त रिक्षाने प्रवास करताना अभिनेत्री मुक्ता बर्वेला एक वेगळाच अनुभव आला. याचबाबत तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Mukta Barve On Instagram)
कलाकार ट्राफिक विषयी असो किंवा रस्त्यांची झालेली दुर्दशा याबाबत खुलेपणाने बोलताना दिसतात. पण अनेकदा अशाप्रकारच्या मुद्द्यांवर बोलूनही परिस्थिती जैसे थे असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुक्ताने पुन्हा एकदा रस्त्यांची झालेली चाळण प्रशासनाच्या नजरेस आणून दिली आहे. रिक्षाने प्रवास करताना मुक्ताला त्रास सहन करावा लागला. तिच्या त्रासामागचं कारण म्हणजे रस्त्यांवरील खड्डे. खड्ड्यांमुळे रिक्षामध्ये नीट मुक्ताला बसताही येत नव्हतं. म्हणूनच तिने एक व्हिडीओ शूट करत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला.
आणखी वाचा – “पुणे तिथे काय उणे इथे…”, भर थिएटरमध्ये माधुरी दीक्षितचा नवऱ्यासाठी खास उखाणा, नेनेंनीही घेतलं नाव
या व्हिडीओमध्ये मुक्ता सतत हलताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करताना तिने म्हटलं की, “आता आपण शिकुया बसल्याजागी करायचा नाच. यासाठी लागणारं साहित्य रिक्षा, खड्डे आणि खड्ड्यातून वाट काढत जाणारा रस्ता.” मुक्ताने अगदी मजेशीर अंदाजात गंभीर समस्या मांडली आहे. मुक्ताने चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला दिसत आहे. याआधीहीने तिने काही सामाजिक विषयांवर अगदी खुलेपणाने भाष्य केलं होतं.
मुक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. आपल्याला चंद्रावर जाण्याची गरज नाही, मुक्ताने नुकताच केलेला नाच अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर सुकन्या मोनेंनीही हसण्याची इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. शिवाय काही मिनिटांमध्येच मुग्धाच्या या व्हिडीओवर अधिकाधिक लाइक व कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.