गेले काही दिवस लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच प्रेक्षकांची लाडकी जोडी गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे यांचा नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला आहे. २१ डिसेंबरला मुग्धा व प्रथमेश बोहोल्यावर चढले आहेत. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. जवळच्या नातेवाईकांच्या व मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुग्धा व प्रथमेश यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. (Mugdha Vaishampayan Mehendi)
मुग्धा व प्रथमेशच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो समोर आले. तसेच दोघांच्या लग्नाआधीच्या विधींच्या साधेपणाचंही सर्वत्र कौतुक करण्यात आलं. ग्रहमख, हळदी समारंभातील त्यांचे फोटो पाहता त्यांच्या साधेपणाची सर्वांनी वाहवा केली. त्यांनतर मुग्धाच्या हळदी समारंभातील फोटोंची झलक पाहण्याची सर्वाना उत्सुकता लागून राहिली होती. अशातच मृग्धा वैशंपायनची मोठी बहीण मृदुलने बहिणीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत शेअर केली आहे.
मृदुलने शेअर केलेल्या मुग्धाच्या मेहंदीसमारंभातील फोटोत दोन बहिणींमधील प्रेमाची झलक पाहणं रंजक ठरतंय. याशिवाय मुग्धाच्या हातावरील आकर्षक मेहंदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धाच्या हातावरच्या मेहंदीवर ‘#MGotModak’ असा हॅशटॅग लिहिण्यात आला आहे याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या रिऍलिटी शोमधून मुग्धाला मॉनिटर तर प्रथमेशला मोदक ही उपमा मिळाली होती. तेव्हापासून या दोघांना मोदक व मॉनिटर या नावांनीच ओळखलं जातं. अखेर लग्नातही त्यांनी त्यांची ही नाव हॅशटॅगद्वारे वापरली आहेत.
याचप्रमाणे अभिनेत्रीच्या दुसऱ्या हातावर “आमचं ठरलंय…” असं लिहिण्यात आलं आहे. मुग्धा व प्रथमेश यांनी सोशल मीडियावर आमचं ठरलं म्हणत पहिल्यांदा प्रेमाची कबुली देत एकत्र फोटो शेअर केला होता. त्यामुळे गायिकेच्या हातावरच्या मेहंदीतही त्यांची ही ओळख पाहायला मिळत आहे.