‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. ‘आमचं ठरलं’ म्हणत या जोडीने रिलेशनशिपमध्ये असल्याची खुशखबर चाहत्यांना दिली होती. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या जोडींपैकी ही एक जोडी आहे. मुग्धा व प्रथमेश नेहमीच काही ना काही सोशल मीडियावरून शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. (Mugdha Vaishampayan On Prathamesh Laghate)
त्यानंतर आता प्रथमेश मुग्धाचा लग्नाबाबत भाष्य केलेला एक व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. प्रथमेश व मुग्धा ‘वैचारिक किडा’ या युट्युब चॅनेलच्याच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी दिलेली मुलाखत पाहणं रंजक ठरतंय. या कार्यक्रमात घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत प्रथमेशने मुग्धाला प्रश्न विचारलेले पाहायला मिळत आहेत. मुलाखती दरम्यान प्रथमेश व मुग्धा यांनी लग्नसंस्था हा विषय निवडला होता. या मुलाखतीदरम्यान प्रथमेशने मुग्धाला लग्नससंस्थेबाबत बरेच प्रश्न विचारले.
दरम्यान प्रथमेशने मुग्धाला एक प्रश्न विचारला, त्यावेळी मुग्धाने उत्तर देत थेट लग्नाआधीच पतीची तक्रार केली. प्रथमेशने मुग्धाला प्रश्न केला की, “रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर असे कोणते मुलींचे प्रॉब्लेम्स असतात जे मुलं समजून घेत नाहीत, एखादा मी ही न समजून घेतलेला प्रॉब्लेम असू शकतो, काय सांगशील याबद्दल?” यावर मुग्धा उत्तर देत म्हणाली, “आता पटकन जे मला प्राब्लेम्स सुचत आहेत ते मी सांगते, बरेचदा मुलींना असं वाटत की, मुलांनी स्वतःहून मुलींना फोन केला पाहिजे. मीच का सतत फोन करायचा. समज आपण जर सात वेळा फोनवर बोलत असू तर किमान तीनदा फोन हे मुलांनीच केले पाहिजेत. आणि उरलेले फोन आम्ही करणार.”
पुढे ती असंही म्हणाली की, “जास्तीत जास्त फोन हे मुलांकडून यायला हवे असं मुलींना वाटत. त्यावर मुग्धाला थांबवत प्रथमेशने विचारलं, तुलाही तसंच वाटत का? यावर हसत उत्तर देत मुग्धा म्हणाली, हो. अलीकडे तू फोन करू लागला आहेस, पण पूर्वी तसं नव्हतं. हा बदल तुझ्यात मीच घडवून आणला आहे.”