बरेच असे चित्रपट आहेत ज्यांचे काही काळाने सिरीज स्वरूपात पुढचे भाग येत असतात. आणि प्रेक्षकही या चित्रपटांच्या पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहत असतात. हिंदी चित्रपटांपासून सुरु झालेला हा ट्रेंड आता मराठी चित्रपटांतही चांगलाच रुजू झाला आहे. अशातच एका लोकप्रिय चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट म्हणजे ‘झिम्मा’. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट केव्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. आता मात्र प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देत एक गुडन्यूज चाहत्यांसमोर आली आहे. (Jhimma 2 Released Soon)
कोरोना काळात संबंध चित्रपटसृष्टी अक्षरशः थांबली होती. कोरोना कालखंडानंतर प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली होती. ‘झिम्मा’ सिनेमाला प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा करण्यात आली. अशातच हेमंत ढोमे व क्षिती जोग यांच्या ‘झिम्मा २’ चित्रपटाची तारीख प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
चित्रपटातील अनेक कलाकारांनी याबाबतची पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. अशातच सायली संजीव हिने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘झिम्मा’ चित्रपटाबाबतची पोस्ट शेअर केली आहे. “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात” अशा आशयाची पोस्ट तिने शेअर करून मोशन पोस्टर शेअर केलं आहे. तिच्या या पोस्टवर चित्रपटाच्या अनेक चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ सिनेमात वेगवेगळ्या पार्श्वभूमी, व्यक्तिमत्व असलेल्या महिला जेव्हा आपल्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आपलं आयुष्य मनमुराद जगण्यासाठी एकत्र येतात. तेव्हा जी त्या धम्माल करतात ते पाहायला मिळालं. आता चित्रपटाच्या दुसऱ्या सिझनमध्ये चित्रपटात हा समस्त महिलावर्ग नेमकी काय धमाल करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.