सिनेसृष्टीतील लोकप्रिय व कायमच चर्चेत असलेली जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेले मुग्धा-प्रथमेश नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करत आले. मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या सुमधुर स्वरांनी चाहत्यांची मन जिंकली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मुग्धा व प्रथमेश यांच्या गाण्याचे लाखो दिवाने चाहते आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रम घेत ही जोडी नेहमीच गायनसेवा करताना दिसते. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
मुग्धा व प्रथमेश सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कांत राहत असतात. शिवाय त्यांच्या कार्यक्रमाचेही अनेक अपडेट ते वेळोवेळी देत असतात. अशातच दोघांनी त्यांच्या गाणगापूर येथील कार्यक्रम सोहळ्यातील खास फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. गाणगापूर येथील दत्त मंदिरात त्यांनी गायनसेवा केली. गाणगापूर येथील दत्त मंदिरात ‘माघ उत्सव संगीत समारोह’करिता लघाटे जोडीला आमंत्रित करण्यात आलं होतं.

गाणगापूर येथील गायनसेवेचे खास फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. गाणगापूर येथील दत्त मंदिरात मुग्धा व प्रथमेश यांनी एकेकाने आपली कला सादर केली. शिवाय दोघांनी मंदिराच्या आवारातील व्हिडीओ शेअर करत मंदिराचेही दर्शन घडविले. मुग्धा व प्रथमेश दोघेही दत्तसेवा करण्यात नेहमीच व्यग्र असल्याचं पाहायला मिळत. लग्नानंतरही दोघांनी प्रथमेशच्या गावच्या घरी दत्तजयंतीनिमित्त दत्तसेवा करत भजनाचा कार्यक्रम केलेला पाहायला मिळाला.
काही दिवसांपूर्वी मुग्धा व प्रथमेश उत्तरप्रदेश येथील दत्त मंदिरात त्यांनी गायनसेवा करत महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांना त्यांच्या सुमधुर स्वरांनी मंत्रमुग्ध केलं. ‘आमचं ठरलं’ म्हणत मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली सोशल मीडियावरुन दिली. त्यानंतर काही दिवसांतच दोघांनी अगदी थाटामाटात लग्नसोहळा उरकला. त्यांच्या लग्नानंतर ही जोडी विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळाली. मुग्धा व प्रथमेश दोघांनीही लग्नानंतर त्यांच्या कामाला सुरुवात केली.