मराठी कलाक्षेत्रातील लोकप्रिय जोडींच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून मुग्धा, प्रथमेश यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या गायनाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मुग्धा व प्रथमेश यांनी आजवर भारतभर दौरे करत त्याच्या गायनकलेने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन सोडलं आहे. मुग्धा-प्रथमेश ही जोडी चर्चेत आली ती म्हणजे त्यांच्या लग्नामुळे. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
‘आमचं ठरलं’ असं म्हणत मुग्धा-प्रथमेशने दोघांचा एकत्र फोटो शेअर करत सोशल मीडियावरुन प्रेमाची जाहीर कबुली देत चाहत्यांना गुडन्यूज दिली. दोघांच्या अफेअरच्या या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का बसला. त्यानंतर मुग्धा व प्रथमेश बऱ्याच एकत्र फोटोंमुळे चर्चेतही आले. त्यांनतर ही जोडी लग्नबंधनात अडकली. दोघांच्या लग्नसोहळ्याचे व लग्नापुर्वीच्या विधींचेही अनेक फोटो, व्हिडीओ चर्चेत राहिले. लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश कामानिमित्त म्हणा, वा कुटुंबाबरोबर अनेकदा फिरताना दिसले.
लग्नानंतर दोघेही त्यांच्या संसारात रमलेले दिसले. मुग्धा व प्रथमेश सध्या कोकणदौरा करण्यात व्यस्त आहेत. दोघेही प्रथमेशच्या आजोळी कोकणात चाफेड येथे फिरायला गेले आहेत. तेथे जाऊन धमाल-मस्ती करतानाचे खास फोटोही ते सोशल मीडियावरुन शेअर करत आहेत. मुग्धाने कोकणात काजूच्या बागेत जात एन्जॉय करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत तिने म्हटलं आहे की, “प्रथमेशच्या आजोळी चाफेड येथे गेलो होतो. मी पहिल्यांदा काजूची बाग बघितली. पहिल्यांदा काजू गोळा केले, निवडले. जाम मज्जा आली. आपला कोकण भारी आसा”, असं कॅप्शन तिने दिलं आहे.
मुग्धाने कोकणात एन्जॉय करतानाच्या शेअर केलेल्या या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश बरेचदा कोकणातील घरी गेलेले पाहायला मिळाले. शिवाय दोघेही त्यांच्या कुटुंबासह लग्नाला तीन महिने पूर्ण होताच देवदर्शनाला गेलेले पाहायला मिळाले.