छोट्या पडद्यावरील ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘मन हे बावरे’, ‘तू तिथे मी’, ‘अस्स सासर सुरेख बाई’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे मृणाल दुसानीस. काही वर्षांपूर्वीच अभिनेत्री विवाहबंधनात अडकली. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तिची ‘हे मन बावरे’ ही मालिका चालू होती. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर मृणाल आपल्या नवऱ्याबरोबर अमेरिकेत राहायला गेली आणि ती तिथेच स्थायिक झाली. यानंतर अखेर चार वर्षांनी अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांबरोबर पुन्हा एकदा भारतात परतली आहे.
काही दिवसांपूर्वी मृणाल भारतात परतली असून तिची पुन्हा एकदा मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. नुकतीच तिने सुलेखा तळवलकरांच्या ‘दिल कें करीब’ मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी तिने अमेरिकेतील काही किस्से चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. यावेळी तिने तिच्या प्रवासाबद्दल, नवऱ्याबद्दल तसेच तिची पुन्हा एकदा मालिकांत काम करण्याविषयीही संवाद साधला. यावेळी तिने तिच्या सासू-सासऱ्यांबद्दलही भाष्य केले.
यावेळी मृणालने असं म्हटलं की, “माझ्या सासरच्या मंडळींनी माझी ‘तू तिथे मी’ मालिका पाहिली होती. जेव्हा ते घरात आले तेव्हा त्यांच्यासाठी ती खूपच छान भावना होती. तू तिथे मी मालिकेतल्या सूनेची भूमिका ही तशी सोशिक व सहन करणारी होती. त्यामुळे त्यांच्यासाठी तो एक सुखद धक्काच होता. कारण ती मालिका ते बघत होते.
यापुढे तिने असं म्हटलं की, “तेव्हा सासू-सासऱ्यांनी बाकी कुटुंबियांना मी त्यांच्या घरी येणार असल्याचं सरप्राइज ठेवलं होतं. पण सगळ्यांनाच कुठून कुठून कळलं होतं की मी सून म्हणून येणार आहे. त्यामुळे सगळेच खूप खुश होते. त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन होती. पण मी खूप वेगळी आणि स्पेशल आहे, अशी त्यांना जाणीव करुन दिली नाही”.
दरम्यान, मृणाल आता कोणत्या नवीन भूमिकेतून आणि कोणत्या नवीन मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयी तिच्या अनेक चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे आता चार वर्षांनी भारतात परतल्यावर अभिनेत्री मालिकांमध्ये पुनरागमन केव्हा करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे