‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीस आज सिनेसृष्टीपासून दूर आहे. ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मनं बावरे’ या मालिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिने साकारलेली प्रत्येक भूमिका छोट्या पडदयावर प्रचंड गाजली. मालिकांमुळेच तिने स्वतःचा असा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मात्र लग्नानंतर अभिनेत्री मालिकाविश्वपासून दूर गेल्याच पाहायला मिळालं. (Mrunal Dusanis New Year Celebration)
मृणालने लग्नानंतर सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. मालिकाविश्वपासून दूर गेल्यानंतर मृणालची चाहते तिला मिस करताना दिसले. मात्र अभिनयातून नाही तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावरुन नेहमीच काही ना काही शेअर करत ती त्यांच्या संपर्कात असते. लग्नानंतर व बाळ झाल्यानंतर मृणाल परदेशात स्थायिक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. मृणालचा पती नीरज मोरे हा परदेशात काम करत असल्याने तीदेखील परदेशात स्थायिक झाली.
२०२२ मध्ये मृणालने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मृणालनं तिच्या मुलीचं नाव नुरवी असं ठेवलं आहे. सध्या मृणाल ही तिच्या कुटुंबासह अमेरिकेतील टेक्सास या राज्यातील डॅलस या शहरात राहते. मृणाल ही तिच्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. अशातच नाताळचं औचित्य साधत मृणालने पती व लेकीबरोबरचे खास सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत, “तुला कधीच क्लिअर फोटो टाकायला जमत नाही का गं” असं गमतीत म्हटलं आहे. चाहत्यांच्या या कमेंटवर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत, “अरे तिच्याकडे चार हजाराचा मोबाईल आहे” असं म्हटलं आहे. चाहत्यांच्या या गमतीशीर कमेंटवर अभिनेत्रीने हसण्याचा इमोजी शेअर केला आहे.