Ajinkya Nanaware And Shivani Surve Engagement : ‘अखेर बंधनात’ असं म्हणत एका लोकप्रिय जोडीने गुपचूप त्यांचा साखरपुडा उरकत खास फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. ही जोडी म्हणजे अभिनेत्री शिवानी सुवे व अभिनेता अजिंक्य ननावरे. थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत शिवानी व अजिंक्यने त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर शिवानी व अजिंक्य लग्नासाठी तयार झाले आहेत.
नुकताच अगदी शाही थाटामाटात शिवानी व अजिंक्यचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. ठाण्यातील येऊर हिल येथे हा सोहळा संपन्न झाला. शिवानी व अजिंक्यच्या साखरपुडा सोहळ्यातील लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. साखरपुड्यासाठी शिवानीने परिधान केलेल्या फिकट जांभळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुललं होतं. वेस्टर्न लूकवर तिने हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला होता. तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट व त्यावर टोपी घातली होती.
आणखी वाचा – शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरेची लगीनघाई सुरु, हळदीसाठी सजला मंडप, खास फोटो समोर
शिवानी-अजिंक्यच्या साखरपुड्यानंतर कलाकार मंडळींसह चाहते दोघांना शुभेच्छा देत आहेत. तर अनेक कलाकारांनीही शिवानी व अजिंक्यच्या या खास प्रसंगी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडेने शिवानी व अजिंक्य ननावरेच्या साखरपुड्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शिवानी-अजिंक्य एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत. पण यादरम्यान शिवानीला कोणत्या हाताच्या बोटात अंगठी घालायची हे अजिंक्यला कळतं नव्हतं. त्यामुळे अभिनेत्री इतरांना याबद्दल विचारताना दिसत आहे.
साखरपुड्यात शिवानी व अजिंक्य अंगठी घालताना गोंधळलेले दिसले. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत, मुलांच्या डाव्या हातात अंगठी घालतात तर मुलीच्या उजव्या हातात अंगठी घालतात. चुकीच्या हातात अंगठी घातली आहे” अशी कमेंट केली आहे. दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. शिवाय त्यांच्या या खास समारंभातील डेकोरेशनच्या फोटो, व्हिडीओनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.