फार कमी वयात मायरा वायकुळ यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली मायरा प्रसिद्ध व लोकप्रिय बालकलाकारांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. मायराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेनंतर ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत दिसली. छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर मायरा हिने सिनेमांमध्ये देखील काम केलं. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातून ती बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Myra Vaikul Brother)
सोशल मीडियावरही मायरा बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शिवाय तिचे आई-बाबाही सोशल मीडियावरुन नेहमीच अपडेट शेअर करत असतात. ९ एप्रिलला त्यांनी सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. मायरा वायकुळने मोठी ताई होणार असल्याचं यावेळी जाहीर केलं होतं. त्यानंतर अखेर वायकुळ कुटुंबात एका गोंडस बाळाचं आगमन झालं. “आमचा छोटा सुपरहिरो आला आहे. आमच्या बाळाला हॅलो म्हणा”, अशी पोस्ट करत मायराने आनंदाची बातमी दिली.
त्यानंतर मायराने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये मायरा तिच्या आई-वडिलांसह तिच्या चिमुकल्या भावाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन येताना दिसत आहे. घरी घेऊन येताना त्यांचं संपूर्ण एकत्र कुटुंबं खूप खुश दिसत आहे. घरी आल्यावर चिमुकल्याचं औक्षण करत त्यांनी त्याच स्वागत केलं. यावेळी फुलांच्या पायघड्याही घातलेल्या पाहायला मिळाल्या. शिवाय घरात फुग्यांच्या डेकोरेशननेही साऱ्यांचं लक्ष वेधलं.
मायराच्या भावाच्या स्वागताला त्यांचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं. घरात औक्षण करुन स्वागत केल्यावर बाळाला त्याच्या सजवलेल्या खोलीत घेऊन गेले. त्यानंतर सहकुटुंब एकत्र येत त्यांनी एक छोटासा केक कट करत सेलिब्रेशन केलं. त्यानंतर त्यांनी चिमुकल्याला घेऊन फोटोसेशनही केलं. यावेळी वायकुळ कुटुंब खूप आनंदी असलेले दिसले. आणि त्यांनी चिमुकल्याचं अगदी दणक्यात स्वागतही केलं. इतकंच नव्हे तर मायराही तिच्या भावासाठी खूप खुश दिसली.