सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास हा मराठी इंडस्ट्रीपासून सुरु केला आहे. आणि कालांतराने ते हिंदी विश्वातही रुजू झाले आहेत. अनेक कलाकारांनी त्याच्या अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. हे कलाकार मराठी कलाविश्वासह हिंदी सिनेविश्वातही आपला जम बसवू पाहतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने मराठी मालिकाविश्वासह हिंदी मालिकेतून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. हा अभिनेता म्हणजे सौरभ चौघुले.
मराठी मालिका, नृत्य यांमधून सौरभने प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडली. (Saurabh Choughule New Serial)
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला’. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंतरा-मल्हार जोडी सुपरहिट झाली. या मालिकेनंतर अंतरा-मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले वास्तवात आयुष्यभराचे जीवनसाथी झाले. ३ मार्च २०२४ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. या मालिकेमुळे सौरभला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मुख्य भूमिका साकारत सौरभने साऱ्यांच्या मनावर राज्य केलं.
आणखी वाचा – संग्रामवर मोठी शस्त्रक्रिया, Bigg Boss च्या घरात झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात भरती, दाखवली सत्य परिस्थिती
सौरभ ‘जीव माझा गुंतला’ मालिकानंतर ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ मालिकेत दिसला. या मालिकेत अभिनेत्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर आता सौरभ हिंदी मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. लवकरच सौरभची नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दंगल वाहिनीवरील ‘सफल होगी तेरी आराधना’ या मालिकेतून सौरभ पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे.
या मालिकेत सौरभ मुख्य भूमिकेत नसला तरी तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं प्रोमोमधून कळतंय. हातात बंदूक घेऊन उभ्या असलेल्या सौरभचा मालिकेतील रावडी लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय. सौरभने आजवर नायकाच्या भूमिका केल्या आहेत मात्र या मालिकेत त्याची खलनायकाची भूमिका पाहणं रंजक ठरणार आहे. याचा प्रोमो त्याने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या प्रोमोखाली त्याची पत्नी योगिता चव्हाण हिने “अरे व्हिलन”, अशी कमेंटही केली आहे. तर विशाल निकम, वनिता खरात, अक्षया नाईक या कलाकारांनी कमेंट करत त्याच कौतुक केलं आहे.