आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रीतील पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार केंद्राबाहेर रांग लावून उभे आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीदेखील पुण्यात मतदानानिमित्त गेले असून ते मतदानानंतरचे काही फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत चाहत्यांना मतदानाचे आवाहन करत आहेत.
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांचे मतदानानंतरचे फोटो शेअर करत सर्वांनी मतदान करावे यासाठी आवाहन करत आहेत. अशातच एका फोटोने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सुप्रसिद्ध मराठी गायिका सावनी रविंद्रने शेअर केलेल्या तिच्या पोस्टमुळे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. गायिकेचे मतदार यादीत नाव नसल्याने ती मतदान न करताच परतली आहे आणि याबद्दल तिने सोशल मीडियावर खेद वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे.
सावनीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “गेले अनेक दिवस सर्व ऑनलाइन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज वोटिंग बूथला जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. (ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी)”
यापुढे तिने “आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत, पण माझे नाही. याबद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली, पण त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले. अत्यंत खेदजनक” असं म्हणत महाराष्ट्र सरकारला टॅगदेखील केले आहे. दरम्यान, सावनीच्या या पोस्टखाली तिच्या अनेक चाहत्यांनी तिला मतदान करता न आल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहेत. तसेच तिला अनेकांनी काही नवनवीन मार्गही सुचवले आहेत.