Kartiki Gaikwad Brother Kelvan : मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु असतानाच आता आणखी एका लग्नसोहळ्याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली. त्यानंतर आता ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाडचा भाऊही विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकीने भावाचा आणि वहिनीचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. तर कार्तिकीचा भाऊ कौस्तुभ गायकवाडचा साखरपुडा समारंभही उरकला. त्याच्या साखरपुड्याची अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. यानंतर आता गायकवाडांच्या घरी लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. याची झलक आता सोशल मीडियावर कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड यांनी शेअर केली आहे.
कल्याणजी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओवरुन लेकाची लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिकीच्या सासरी तिच्या भावाच्या आणि वहिनीच्या केळवणाचा थाट घातला आहे. कार्तिकीने कौस्तुभच्या केळवणासाठी जय्यत तयारी केलेली पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये याची प्रत्यक्ष झलक पाहायला मिळत आहे. यांत कार्तिकी कौस्तुभ आणि तिच्या वहिनीला औक्षण करुन त्यांच्या स्वागत करताना दिसत आहे.
यावेळी तिने दारासमोर फुलांच्या पायघड्या घातलेल्या दिसत आहेत. याशिवाय तिने तिच्या आई-बाबांचं औक्षण करत स्वागत केलं आहे. यावेळी कार्तिकीच्या सासरची मंडळी तिथे उपस्थित होती. शिवाय गोडाधोडाच्या जेवणाचा साग्रसंगीत असा घाटही केळवण स्पेशल घातलेला दिसला. यावेळी कार्तिकी आणि तिचं कुटुंबीय खूप आनंदी दिसलं.
कार्तिकीला आपल्या घरातच गायनाचा वारसा लाभलेला आहे. तिचा भाऊ कौस्तुभ गायकवाड सुद्धा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. कार्तिकी, तिचे वडील व भाऊ कौस्तुभ मिळून गाण्यांचे अनेक शोज देखील करतात. याशिवाय त्याने अनेक भक्तीगीत व अभंग गायली आहेत. अशातच आता हा गायक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे.