‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या मालिकेतील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आजही ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील काही ठराविक संवाद प्रेक्षक विसरले नाहीत. ‘काहीही हा श्री’ हा संवाद तर अजरामर झाला असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. यामध्ये काम करणाऱ्या कित्येक कलाकारांनाही आज याच मालिकेमुळे ओळखलं जातं. एखाद्या कलाकृतीमुळे प्रेक्षकांनी आपल्याला ओळखणं हे फार कमी कलाकारांच्या वाट्याला येतं. ‘होणार सून मी ह्या घरची’मधील कलाकारांच्या वाट्याला हे सुख आलं. या मालिकेतील शशीकला हे पात्र सगळ्यांनाच आठवत असेल. अभिनेत्री आशा शेलार यांनी ही भूमिका उत्तम साकरली. त्यांच्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. (honar soon me hya gharchi actress asha shelar)
जान्हवीच्या (तेजश्री प्रधान) आईची भूमिका आशा यांनी साकारलेली. नकारात्मक भूमिका त्यांनी उत्तम पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. मालिका पाहताना प्रेक्षकांना चक्क शशीकलाचा नव्हे तर आशा यांचाच राग यायचा. ‘होणार सून मी ह्या घरची’ आशा यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला असला तरी त्यांनी आजवर बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. पण त्याचबरोबरीने त्यांनी बँकमध्ये नोकरी केली. याचबाबत त्यांनी ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात सांगितलं.
आणखी वाचा – अपघातानंतर परेश रावल प्यायचे स्वतःचीच लघवी, अभिनेत्याचा मोठा दावा, म्हणाले, “बियरसारखी लघवी प्यायचो कारण…”
आशा म्हणाल्या, “बँक ऑफ इंडियामध्ये मी गेली ३९ वर्ष नोकरी केली. इंडस्ट्रीमधील बऱ्याच लोकांना याबाबत माहिती आहे. कधीतरी याचा फायदाही व्हायचा पण कधीतरी तोटाही. तोटा याच्यासाठी की, कोणतीही भूमिका असेल तर आशाताईंची नोकरी आहे ना कशाला? असं व्हायचं. हे होणं स्वाभाविकच आहे कारण मी नोकरी करत आहे. आता काही दिवसांपूर्वीच मी सेवानिवृत्ती घेतली आहे. यावरुनच तुम्हाला समजलं असेल की, आता मी ६० वर्षांची आहे”.
“आता मी इंडस्ट्रीत नव्या जोमाने काम करण्यास तयार आहे. माझ्या आवाजाला, लूकला, न्याय देणारी भूमिका मी करु शकते. अर्थात २२ २३ वर्षांच्या तरुणीची भूमिका आता मला मिळणार नाही. पण त्याच तरुणींच्या आई, सासूची भूमिका मी साकारु शकते. या भूमिका सध्या काळाची गरज आहेत. लोकांना मी आवडते हे मी स्वतःच सांगेत”. एकूणच काय तर आशा शेलार लवकरच मालिकांमध्ये काम करताना दिसतील यांत शंका नाही.