सध्या मराठीमध्ये नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मे महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी तर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. अशातच आता आणखी एक मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘सजना’ असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचं टायटल गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या आवाजाने चार चाँद लागले आहेत. त्यांनी हे गाणं गायलं आहे. ‘सजना’च्या टायटल गाण्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘सजना’च्या गाण्यामध्ये प्रेमाचा गोडवा आहे. नात्यातील प्रेमळ क्षण, हळूवार फुलत जाणारं नातं किती सुंदर असतं हे या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोनू निगम आणि राजेश्वरी पवारच्या आवाजात सजलेले हे गाणं प्रेमाची नाजूक भावना व्यक्त करते. ओंकारस्वरुप यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. हे गाणं म्हणजे प्रेमाच्या भावना, आठवणी आणि नात्यांची गुंफण उलगडणारं सुंदर चित्रण आहे. गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
‘सजना’ ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनही शशिकांत धोत्रे यांनी केलं आहे. ‘सजना’ हा नवा चित्रपट २३ मे २०२५ ला चित्रपटगृहांत दाखल होईल.