मराठी चित्रपटांच्या यादीत सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटाची विशेष चर्चा सुरु आहे. सात महिला आणि एका पुरुषाभोवती फिरणाऱ्या या कथानकाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर या चित्रपटातील “मराठी पोरी दुनियेला दाखवती माज” या गाण्याने ही सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. कलाकार मंडळींसह ते सर्वसामान्यांपर्यंत साऱ्यांनीच या गाण्यावर ठेका धरत धुडगूस घातला. (Jhimma 2 Trailer)
आता ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या टिझर व गाण्यानंतर ट्रेलरही सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. “त्या देऊन धडक आल्यात तडक… होऊन मोकाट आता! त्या सोडून फिअर टाकून गिअर झाल्यात सुसाट आता! सादर आहे आपल्या ‘झिम्मा २’चा ट्रेलर! धुड्डूऽऽऽम! ‘झिम्मा २’ २४ नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात” असं कॅप्शन देत चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे.
चित्रपटाच्या टीझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे. टीझरमध्ये इंदू डार्लिंगच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजलेली ट्रिप, तसेच प्रत्येक महिलेच्या अवतीभोवती फिरणाऱ्या धूसरश्या जगाची खोली या टीझरमध्ये उलगडताना दिसत आहे. ट्रेलरमधील “जोपर्यंत जिवंत जीव आहे ना तोपर्यंत पुरेपूर जगून घेणार” या वाक्याने जगण्याला किती अर्थ आहे आणि असायला हवा याची जाणीव करून दिली आहे. टीझरमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे यांच्या महत्वपूर्ण भूमिका पाहणं रंजक ठरतंय.
या चित्रपटाचा पहिला भाग ‘झिम्मा’ हा २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळीच ‘झिम्मा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ‘झिम्मा २’ बद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. आता मात्र चित्रपटाच्या ट्रेलरने ही उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. येत्या २४ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास सज्ज होत आहे.