सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल सुरू आहे. सामान्य जनतेबरोबरच कलाकार मंडळींमध्ये देखील दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी आपल्या सोशल मीडियावरुन त्यांच्या चाहत्यांबरोबर दिवाळीचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री ऋतुजा बागवेने तिच्या सोशल मीडियावर दिवाळीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती आकाश कंदील बनवताना दिसत आहे. ऋतुजाने दिवाळीचा कंदील स्वत:च्या हाताने बनवत यंदाची दिवाळी साजरी केली आहे. (Actress Rutuja Bagwe Shared Video)
कुठल्याही सणावाराला ऋतुजा नेहमीच तिच्या हातांनी सजावट करत तो सण साजरा करताना दिसते. गणपतीतही ऋतुजाने तिच्या घरच्या बाप्पाचा मखर घरीच स्वत:च्या हाताने बनवला होता आणि आताही तिने दिवाळीनिमित्त घरच्या घरीच आकाश कंदील बनवला आहे. हा आकाश कंदील बनवतानाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने त्याखाली “शुभ दीपावली” असं म्हणत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
या व्हिडीओखाली तिला तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देत दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर घरगुती कंदील बनवतानाचा व्हिडीओ तिने शेअर केल्यानिमित्त तिचं कौतुकदेखील केलं आहे. मराठी मनोरंजनविश्वात ऋतुजाने आपल्या अभिनयानं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावर देखील सक्रीय असते. सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडिओ, रील्स शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
आणखी वाचा – “बाबासाहेब तुम्ही म्हणालात…”, शिंदे कुटुंबियांनी पंढरपुरात सुरु केला नाव व्यवसाय, म्हणाले, “आता विषय…”
आगामी काळात तिचा ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटातून ती एका वेगळ्याच भूमिकेत तिच्या चाहत्यांना दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेते भरत जाधव, गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि अभिनेत्री रितिका क्षोत्री, माधुरी पवार यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान ‘लंडन मिसळ’ या चित्रपटातून ऋतुजा नायिका म्हणून प्रथमचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे.