Swapna Waghmare Joshi House Theft : प्रसिद्ध मराठी दिग्दर्शिका स्वप्ना जोशी वाघमारे यांच्या घरी रविवारी पहाटे चोरी झाली होती. चोराने सहाव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये शिरत घरातून एकूण ६ हजार रुपयांची चोरी केली होती. अशातच आता स्वप्ना जोशी यांच्या घरात चोरी करुन पळालेल्या चोराला पोलिसांनी दोन दिवसात ताब्यात घेतलं आहे. पाइपवर चढून आरोपी स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या बेडरूममध्ये घुसला आणि त्याने ६ हजार रुपये चोरले होते. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि अखेर पोलिसांनी या आरोपीला शोधून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनिकेत कोंडर असे आरोपीचे नाव आहे. (Swapna Waghmare Joshi House Theft Arrested)
रविवारी पहाटे चोराने स्वप्ना जोशी यांच्या फ्लॅटमध्ये चोरी केली. त्याच्या चोरीचा सगळा थरार घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळालं की, चोरट्याने पाचव्या मजल्यावर जाण्यासाठी सुरक्षा लोखंडी जाळी कापली. तो सहाव्या मजल्यावर गेला आणि त्याच मार्गाने पळाला. त्याच दिवशी पोलिसांनी जोशी यांच्या निवासस्थानापासून सुमारे २ किमी अंतरावर कापसवाडी, वर्सोवा येथून आरोपीला शोधून काढलं.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अंकिताने छोटा पुढारीला जमिनीवर लोळवलं, पाय धरुन मागे खेचलं अन्…; कोण कोणावर भारी पडणार?
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, आंबोली पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने याबद्दल असं सांगितले की, “त्याने चोरीची रक्कम अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी खर्च केली आहे. चौकशीदरम्यान, त्याने लोखंडी जाळीवर चढून फ्लॅटमध्ये प्रवेश केल्याची कबुली दिली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसंच पोलिसांना माहिती देणाऱ्या अनेक व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपीला अटक करण्यात आली. सध्या त्याची चौकशी सुरु असून अधिक तपास करण्यात येत आहे. तो अंधेरी पश्चिम येथील रहिवासी असून आरोपीविरोधात यापूर्वीही जुहू, डी.एन. नगर, वर्सोवा व अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
तसंच स्वप्ना जोशी यांनीही ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या वृत्तात असं म्हटलं आहे की, “मला संशय आहे की, शेजारच्या परिसरात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यसनाधीनांपैकी कोणीतरी चोरटा आहे. कारण या व्यक्तीने रोख रक्कम चोरून नेलेल्या मार्गावर सामान्य व्यक्ती चढू शकत नाही आणि बाहेर पडू शकत नाही. सुदैवाने, त्याच्याकडे काही शस्त्र नव्हतं. आमचे पाळीव प्राणी नसते तर तो निसटला असता. मांजरीने आम्हाला सावध केले नाही, ज्या प्रकारे पोलिसांनी त्याला शोधून काढले त्यांचेही कौतुक केले पाहिजे”.