Kedar Shinde Post : चित्रपट घडवण्यापासून ते प्रदर्शित करण्यापर्यंत एक दिग्दर्शक फार महत्वाची भूमिका बजावतो. तर अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तम दिग्दर्शक केदार शिंदे हे नेहमीच चर्चेत असतात. केदार शिंदेने दिग्दर्शित केलेले बहुतेक सिनेमे मोठ्या प्रमाणात गाजले. ‘जत्रा’, ‘खो-खो’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ आणि काही महिन्यापूर्वीच प्रदर्शित झालेला ‘झापुक झुपुक’ या सिनेमांमुळे केदार चर्चेत होता. तर आता दिग्दर्शक केदार शिंदे हा त्याच्या सोशल मिडियावरील एका खास पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. केदार शिंदेने श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
स्वामींची प्रचिती आल्याचं आजकाल अनेक कलाकार मंडळींकडून वा सर्वसामान्य व्यक्तींकडून ऐकायला मिळतं. स्वामींची प्रचिती आल्याचा अनेकदा अनुभव अभिनेते, दिदर्शक केदार शिंदे यांनी शेअर केला आहे. यापूर्वीही केदार शिंदे अनेकदा स्वामींबाबत बोलताना दिसले आहेत. त्यामुळे केदार आणि स्वामीं यांचं नातं साऱ्यांनाच ठाऊक आहे. अशातच आता केदार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वामी समर्थांबरोबरचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
आणखी वाचा – “प्रेम नको गिफ्ट द्या”, निना गुप्ता यांनी प्रेमाला मूर्खपणा म्हटलं आणि…; म्हणाल्या, “फक्त हे पुरेसे नाही”
ज्यामध्ये त्यांनी स्वामी समर्थांसह एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “श्री स्वामी समर्थ महाराज की जय. १९९७ रोजी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. तोवर मला ठाऊक नव्हतं तुमच्याविषयी. कारण आमच्या घराण्यात कुणीही तुमची सेवा भक्ती केली नव्हती. ती संधी तुम्ही मला दिलीत. मार्ग दाखवला. माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. तुम्ही नसतात तर कदाचित मी नसतोच. कारण खुप स्थित्यंतर या वर्षात घडली. आज २८ वर्षे पुर्ण होतायत. श्वासाच्या शेवट तुमच्या नामानेच व्हावा हीच तुमच्या पायी प्रार्थना. आज व्यावसायिक रंगभूमीवर माझं गाजलेल नाटक आमच्या सारखे आम्हीच यालाही २८ वर्षे पुर्ण झाली. कदाचित त्याच दिवशी आयुष्यात येऊन मला जाणीव करुन दिलीत तुम्ही… आमच्या सारखे आम्हीच”, असं म्हणत केदार शिंदेने भावना व्यक्त केल्या.
त्यांनी शेअर केल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी ‘श्री स्वामी समर्थ’ लिहीत कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या केदार यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.





